एसटी धावणार विद्युत वेगाने! ताफ्यात येणार ५ हजार १५० ई-बस

121

राज्य परिवहन महामंडळ लवकरच आपल्या ताफ्यात तब्बल ५ हजार १५० ई-बस दाखल करत आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेलादेखील सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ शहरी भागापुरतीच मर्यादित राहिलेल्या इलेक्ट्रिक एसटी गाड्यांचा आता विस्तार होऊन निमशहरी तसेच ग्रामीण भागात देखील या बस धावतील. त्यासाठी एसटी प्रशासनाने आपल्या १०१ डेपोत १७२ चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनादेखील वातानुकूलित बसने प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी प्रवाशांना आणखी किमान एक वर्ष तरी वाट पहावी लागणार आहे.

( हेही वाचा : पोषण पंधरवडा : केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण उपक्रम, काय आहे उद्दिष्ट? )

एसटीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या १३ हजार ५०० बस गाड्या आहेत. त्यामुळे एसटी प्रशासन गाड्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात राज्य परिवहन महामंडळासाठी ५ हजार १५० नवीन बस घेण्याच्या घोषणा झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी एसटी महामंडळाने निविदा प्रक्रियेला सुरवात केली आहे. यात ९ मीटरच्या २३५० आणि १२ मीटरच्या २८०० ई-बसची निविदा काढली आहे. पहिल्या टप्प्यातच बसचे प्रतिकिमीचे दर ठरविण्याचे काम केले जाईल. या बस ताफ्यात दाखल झाल्यास मराठवाडा, विदर्भ तसेच उर्वरित महाराष्ट्रातील नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे. निविदा प्रक्रिया व अन्य तांत्रिक बाबी पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी आणखी किमान एक वर्षाचा तरी कालावधी लागणार आहे. दरम्यान, एसटी प्रशासनामार्फत राज्यातील १०१ डेपोत १७२ चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.