राज्यात हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट सुरू आहे; जयंत पाटलांचा आरोप

141
हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सोमवारी विधानसभेत केला.
हिंदू देवस्थानांच्या जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहिती कागदपत्रांसहीत जयंत पाटील यांनी सभागृहात सादर केली. या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत? राजकीय नेते कोण आहेत? याचा लाभ कोणाला झाला? याचा खुलासा मंत्री महोदयांनी करावा अशी मागणीही त्यांनी केली.
एका महिन्याच्या आत विशेष अधिकारी नेमून ‘दूध का दूध, पानी का पानी’ करावे आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी जयंत पाटील यांनी केली.
गायरान जमिनींची स्थितीही फारशी वेगळी नाही. एकीकडे गावातील लोक गायरान जमिनी विकत आहेत तर दुसरीकडे ज्यांना रहायला जागा नाही असे गोरगरीब नाईलाजाने या जमिनींवर अतिक्रमण करून तिथे रहात आहेत. त्यांच्या राहण्याच्या प्रश्नाचीही दखल घ्यावी अशी सूचनाही जयंत पाटील यांनी केली.

नोकरभरती का रखडली?

नोकरभरती नसल्याने अनेक युवक पीडब्ल्यूडीमध्ये परीक्षा देऊन घरी बसले आहेत. २०२०च्या एमपीएससी बॅचच्या मुलांना अद्याप कामात रुजू केलेले नाही. त्यामुळे फक्त निवडणुकीपूर्वीची घोषणा न राहता लवकर नोकरभरती करावी, अशी विनंतीही जयंत पाटील यांनी केली.

सरकारची भूमिका शेतकऱ्याला फसवणारी

कांदा उत्पादक, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सरकार आणत आहे. पण विम्याचे हप्ते भरण्यास शेतकऱ्याने कधीच नकार दिलेला नव्हता. त्यांचा आक्षेप जाचक अटींबाबत आहे. या जाचक अटी दुरुस्त करण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी विम्याच्या विरोधात आहेत. आता एक रुपया भरून विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या दारातच उभे करणार नाहीत. त्यामुळे सरकारची भूमिका शेतकऱ्याला फसवणारी आहे असा जोरदार हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.