जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून मुंबई महापालिकेच्या एम पश्चिम विभागाने फर्निचरसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लायवूडच्या टाकावू तुकड्यांपासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार केली. मुंबई महापालिकेच्या एम-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या संकल्पनेतून कनिष्ठ उद्यान अधिकारी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी तब्बल २५ चिमण्यांची घरटी तयार करत महापालिका कार्यालयासह डायमंड गार्डन आणि इतर उद्यानांमध्ये ही घरटी लावून जागतिक चिमणी दिन साजरा केला.
मुंबईतील वाढते शहरीकरण, प्रदुषण, आधुनिक गृहबांधणीच्या पद्धतीमुळे पक्षांना घरटे बांधण्याकरिता जागाच उपलब्ध नाही. सिमेंटच्या या जंगला पक्षी घरटे बांधण्यासाठी जागा शोधत आहे. या पक्ष्यांमध्ये सर्वांत जास्त वावरणारा पक्षी म्हणजे चिमणी. या चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.
जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने चिमण्यांना आसरा मिळावा, त्यांची संख्या वाढावी या उद्देशाने महानगरपालिका एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाच्या आवारातील विविध झाडांवर चिमण्यांकरता घरटी बनवून लावण्यात आली, तसेच एम पश्चिम विभाग हद्दीतील स्वातंत्र्य सैनिक उद्यानात (चिमणी गार्डन) चिमण्याकरता कृत्रिम घरटी लावण्यात आली.
सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या सूचनेनुसार कनिष्ठ उद्यान अधिकारी इंगळे यांनी महापालिका कार्यालयात फर्निचर बनवताना शिल्लक राहिलेल्या टाकाऊ प्लाय वूडच्या तुकड्यांचा शोध घेऊन इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही घरटी बनवली. यामध्ये तब्बल २५ घरटी बनवली गेली आणि यातील पाच घरटी ही एम पश्चिम विभाग कार्यालयातील विविध झाडांवर लावण्यात आली, तर उर्वरीत डायमंट गार्डनसह इतर उद्यानातील झाडांवर लावण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
(हेही वाचा – मुंबई महापालिकेत प्रत्येक महिन्याला सादर होणार लेखा परिक्षण अहवाल?)
Join Our WhatsApp Community