मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम मे २०२३ अखेर, तर दुसऱ्या मार्गिकेचे काम डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण होईल. हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री चव्हाण म्हणाले की, मागील १० वर्षे हे काम सुरू आहे. यामध्ये भूसंपादनाच्या बाबतीत असलेल्या अडचणी दूर करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे.
पनवेल ते इंदापूर रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी पनवेल ते कासू रस्त्यासाठी १५१ कोटी रुपये, तर कासू ते इंदापूर रस्त्यासाठी ३३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामासाठी दोन वेगवेगळ्या संस्था नियुक्त केल्या असून त्यांच्यामार्फत काम सुरू आहे. या रस्त्यांचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी ड्रोन बसविण्यात आले आहेत. रोजच्या कामाचा आढावा घेतला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास मान्यता – चंद्रकांत पाटील)
Join Our WhatsApp Community