विधानपरिषद सभागृहात आमदारांच्या आसनावर एक सर्वसामान्य व्यक्ती येऊन बसल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यानंतर विधिमंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर सवाल उपस्थित करण्यात आले होते. मात्र, मिटकरी यांनी दावा केल्यानुसार निळा शर्ट घालून विधानपरिषदेत आलेली ‘ती’ व्यक्ती आमदारच असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी १० मार्च रोजी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहित एक संशयास्पद व्यक्ती सभागृहात घुसल्याचा दावा केला होता. त्यानंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर गोऱ्हे यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. अमोल मिटकरी यांनी दावा केलेली व्यक्ती ही संशयित नसून, सभागृहाचे सदस्य रमेश कराड होते, असे उपसभापतींनी स्पष्ट केले आहे.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या…
विधानपरिषदेत याप्रकरणी खुलासा करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “काही लोक विधिमंडळात अभ्यासासाठी येतात, काही लोक कामकाज बघायला येतात. त्यांना आपण परवानगी दिली पाहिजे. १० मार्च रोजी आमदार अमोल मिटकरी यांनी माझ्याकडे तक्रार केली होती, सभागृहात निळा शर्ट परिधान केलेली, एक संशयित व्यक्ती कामकाज सुरू असताना सभागृहात बसली होती. या तक्रारीमुळे मला काही तासांतच अनेक वृत्तवाहिन्यांचे फोन आले. सभागृहात कोण व्यक्ती आली होती, अशी विचारणा मला माध्यमांनी केली. याबाबतीत मी सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितलं. मी माध्यमांना विनंती केली बातमी लावू नका, अजून शहानिशा झाली नाही. पण कर्तव्यदक्ष माध्यमांनी ऐकलं नाही. त्यांनी याचे फुटेजही दाखवले. निळा शर्ट परिधान केलेली व्यक्ती कोण होती? हे पाहिल्यानंतर कळलं की, ती व्यक्ती आमदार रमेश कराड आहेत. पण मिटकरी यांनी रमेश कराड यांना ओळखलंच नाही. त्यांनी ती दुसरी व्यक्ती वाटली. मिटकरींना कराड हे अज्ञात व्यक्ती का वाटावी? असा प्रश्न मला आहे. कराडांना मिटकरींना ओळखलं नाही. यामध्ये विधानभवन सुरक्षेची त्रुटी नसून, मिटकरी यांच्याकडून अनवधाने काही गोष्टी घडलेल्या आहेत,” असे गोऱ्हे म्हणाल्या.
मिटकरी यांची सारवासारव
उप सभापतींच्या खुलाश्यानंतर मिटकरी यांनी सारवासारव केली. ते म्हणाले, “मी सभागृहाला प्रामाणिकपणे सांगतो, मी इतर सदस्यांना विचारलं की, कोण आहे ही व्यक्ती? इतर सदस्य ही म्हणाले, की आमच्याही परिचयाचे नाहीत. यानंतर मी सभापतींना पत्र लिहलं की, ही व्यक्ती सभागृहाची सदस्य आहे की नाही, याबद्दल अवगत करा. याबद्दल मी मीडियाला सांगितलं नाही. विधानभवनच्या एका अधिकाऱ्याकडून मला जो फोटो आला, मी त्यांना सांगितलं की, ही व्यक्ती ती नाही. निळा शर्ट होता. म्हात्रे, श्रीकांत भारतीय अशा दोन तीन सदस्यांनी निळा शर्ट परिधान केला होता.”
Join Our WhatsApp Community