आज शिवतीर्थावर जमलेली गर्दी पहा, इथला कोपरान् कोपरा भरला आहे. हा संपलेला पक्ष, आहे का? आम्हाला संपलेला पक्ष म्हणणाऱ्यांची अवस्था पहा, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या जुन्या विधानाचा समाचार घेतला. राज म्हणाले, महाराष्ट्रातील गेल्या दोन-तीन वर्षांतील राजकीय स्थिती पाहतोय. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारणाचा झालेला बट्ट्याबोळ आपण पाहत आलो आहोत. ते पाहत असताना मनाला वाईट वाटत होतेच. पण ज्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे तुझं का माझं, हे सुरू होतं, त्यावेळी वेदना होत होत्या.
लहानपणापासून हा पक्ष पाहत आलो, तो पक्ष जगलो. असंख्य लोकांनी कष्ट घेऊन उभी केलेली ही एक संघटना होती. मी ज्यावेळी पक्षातून बाहेर पडलो, त्यावेळी शिवतीर्थावर बोलताना म्हटले होते, माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालतील, याची मला जाणीव होती. त्यामुळे मी बाहेर पडलो. आज तिच स्थिती पाहायला मिळत आहे, असेही राज म्हणाले.
…नाहीतर मी काय बोलेन याचा नेम नाही!
राज ठाकरेला शिवसेना प्रमुख व्हायचं होतं, त्याला संपूर्ण पक्ष ताब्यात हवा होता, म्हणून तो बाहेर पडला, असा आरोप केला जातो. पण ते सगळं खोटं होतं. कारण शिवसेनेचं चिन्ह फक्त धनुष्यबाण नव्हता, तो शिवधनुष्य होता आणि बाळासाहेबांचा शिवधनुष्य पेलणं सोपं नव्हतं. एकाला झेपलं नाही, दुसऱ्याला झेपणार की ते माहीत नाही. पण, मला घरातल्या गोष्टी बाहेर काढायच्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या बाजुच्यांना आताच सांगून ठेवतो, माझं भाषण संपल्यानंतर तोंड उचकटू नका. नाहीतर मी काय बोलेन याचा नेम नाही, असा इशाराही राज यांनी उद्धव सेनेला दिला.
(हेही वाचा – मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी उद्धवने कुरापती केल्या; राज ठाकरेंचा घणाघात)
Join Our WhatsApp Community