राज ठाकरेंनी दाखवलेल्या समुद्रातील बेकायदा दर्ग्याची पोलीस करणार पाहणी

125

माहीम मगदूम शा बाबा दर्गाच्या मागे असलेल्या समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवार, २२ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी जाहीर सभेत केला. त्यावरून मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी भाषणात केलेल्या आरोपानुसार जागेची पाहणी करून पडताळणी करण्यात येणार आहे, असे मुंबई पोलीस आयुक्त विवेक विवेक फणसाळकर यांनी सांगितले.

मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आता त्या जागेची पडताळणी करणार आहेत. ती जागा जिल्हाधिकारी यांच्या प्रांतात येत असल्याची प्राथमिक माहिती असल्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस दोघांकडून जागा पडताळली जाणार आहे, जर तथ्य असेल आणि अनधिकृत बांधकाम असेल तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार. गुरुवार, २३ मार्च रोजी वरिष्ठ पोलीसांचे पथक या ठिकाणची पाहणी करणार आहे, दरम्यान या ठिकाणी तसेच आसपासच्या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे, असेही पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी सांगितले.

(हेही वाचा राज ठाकरेंनी सभेत दाखवला माहीमच्या समुद्रातील बेकायदा दर्गा; कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना दिला अल्टिमेटम )

काय म्हणाले होते राज ठाकरे?

प्रशासन म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते, प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे. देशातील मुसलमानाने हे पाहून त्यांना हे मान्य आहे का, हे सांगावे. मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी यावर कारवाई केली नाही तर महिनाभरात काय होईल याचा अंदाज घ्या. माहीम येथील मगदूम बाबा दर्ग्यासमोर समुद्रात बेकारीदेशीर दर्गा उभा केला आहे, कुणाचे लक्ष नाही. दिवसाढवळ्या समुद्रात नवीन हाजीअली तयार करणार का? आता प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना आजच सांगतो, महिनाभराच्या आत हे जर तोडले नाही, तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठे गणपतीचे मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही, मग साला काय व्हायचे ते होऊ द्या. असे बेकायदेशीर बांधकाम चालू देणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.