ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवून ज्येष्ठ नेते, खासदार गजानन किर्तीकर यांची गुरुवारी नियुक्ती करण्यात आली. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना अधिकृत पत्राद्वारे दिल्याची माहिती समोर आली. तेव्हापासून यावर संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून आज पद गेले, उद्या परत येईल. एवढी हिंमत आमच्या पक्षामध्ये आहे आणि नेतृत्वामध्ये आहे, असे राऊत म्हणाले.
अशी अनेक पद ओवाळून टाकतो
प्रसार माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘आम्ही जर खोके घेतले असते आणि गुडघे टेकले असते, तर आम्ही त्या पदावर राहिलो असतो. आम्हालाही सांगण्यात आलं, कशा राहताय, काय राहिलंय, तुम्ही या आमच्याकडे. मी म्हटलो, थुकतो तुमच्यावर ऑफरवर. मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आमची शिवसेना यांच्याशी बेईमानी करणार नाही. अशी अनेक पद ओवाळून टाकतो. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही निष्ठावंत आहोत. माझ्या पक्षाने जे दिलंय ते भरपूर दिलेलं आहे. आणि जर काही जात असेल, निष्ठा राखण्यासाठी तर आम्ही गमवायला तयार आहोत. पण एखाद्या पदासाठी लाचारी पत्करणारा संजय राऊत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जे माझ्यावर संस्कार केलेत ना, ते निष्ठेचे आणि इमानदारीचे आहेत. पदासाठी, सत्तेसाठी गुडघे टेकण्याचे नाहीत. आज पद गेले, उद्या परत येईल. एवढी हिंमत आमच्या पक्षामध्ये आहे आणि नेतृत्वामध्ये आहे.’
(हेही वाचा – राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्यावर अजित पवारांचा आक्षेप; फडणवीस आक्रमक होऊन म्हणाले…)
Join Our WhatsApp Community