पश्चिम आकाशात चंद्र-शुक्राची पिधान युती शुक्रवारी, २४ मार्चला सायंकाळी पाहायला मिळणार आहे. ही पिधान युती महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी सुर्यास्तापूर्वी होणार असल्याने नुसत्या डोळ्यांनी दिसणे अवघड आहे. मात्र दुर्बिणीतून ही पिधान युती पाहायला मिळणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजता पश्चिम आकाशात चंद्रकोरीच्यावरील बाजुकडून शुक्र ग्रह स्पर्श करेल आणि तो चंद्राच्या पाठीमागे नाहीसा होईल. यावेळेस शुक्र पृथ्वीपासून १८ कोटी ५३ लाख ८१ हजार किलोमीटर अंतरावर राहणार असून यावेळेस त्याची तेजस्विता उणे ३.९८ असेल. ही घटना घडत असताना पश्चिम आकाशात सूर्य अद्याप मावळलेला नसेल यामुळे आपण एका सुंदर अशा खगोलीय घटनेला नुसत्या डोळ्यांनी पाहण्याची अपूर्व संधी गमावणार आहोत. यावेळेस आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र मात्र ३ लाख ७२ हजार ७०२ किलोमीटर अंतरावर असणार असून यावेळेस त्याची तेजस्विता उणे ८.२९ असेल. जवळपास पंच्यान्नव मिनिटे चंद्रकोरी मागे लपलेला शुक्र ग्रह सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या खालील बाजूकडून बाहेर पडताना दिसेल. या विलोभनीय पिधान युतीचा मोक्ष होईल. छत्रपती संभाजीनगर येथे सायंकाळी ६.८ वाजता सूर्यास्त होईल. यानंतर चंद्र कोरीच्या खालील बाजूस तेजस्वी शुक्र सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. या खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन औंधकर यांनी केले आहे.
एमजीएम विज्ञान केंद्रात दुर्बिणीतून पाहण्याची व्यवस्था
चंद्र शुक्राच्या पिधान युतीचा स्पर्श आणि मोक्ष दुर्बिणीतून सायंकाळी पाहायला मिळणार आहे. यासाठी एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, एन-6 सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे यावे, असे आवाहन एमजीएम विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.
(हेही वाचा – भूकंपाबाबत वैज्ञानिकाने केलेली ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी)
Join Our WhatsApp Community