विधानसभेत गुरुवार प्रमाणे शुक्रवारीही गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विधानसभेत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार संतापले आणि म्हणाले की, ‘देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. २३ कोटी मतदारांनी निवडून दिले आहे. कुणाच्या औकातीत नाही हे. कुणाच्या भीकेवर ते पंतप्रधान पद नाही.’
यानंतर सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले. आधी २० मिनिटे आणि नंतर १५ मिनिटांसाठी सभागृहाचे स्थगित करण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले आणि यासंदर्भात शनिवारी सकाळी निकाल देणार असल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.
नक्की काय घडले?
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन सत्ताधारी आमदारांनी केल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला होता. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या आंदोलनावर आक्षेप नोंदवला होता. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात तपास करून कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. पण अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे शुक्रवारी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संबंधितांच्या निलंबनाची मागणी केली.
खोके-बोके म्हटले जाते ते कसे चालते?
पेटोलेंच्या या मागणीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केला. ते म्हणाले की, याच सदनाच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्र्यांना खोके-बोके म्हणतात, तेव्हा काय होते? मुख्यमंत्री संविधानिक पदावर बसलेले नाहीयेत का? मुख्यमंत्र्यांना खोके-बोके म्हटले जाते ते कसे चालते?, असा सवाल शेलारांनी उपस्थित केला. याच दरम्यान विरोधी बाकांवरून ‘मोदी चोर है’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
हा वाद आणखी पेटू नये म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी यात मध्यस्थी करून अहवाल तपासून निर्णय घेऊ, असे सभागृहाला सांगितले. पण तरीदेखील सभागृहातील गोंधळ हा काही थांबला नाही. त्यावेळेस भाजप आमदार सुधीर मुनगंटीवर संतापले.
पळपुट्या माणसाच्या पक्षाने मोदींना…
मुनंगटीवार म्हणाले की, ‘देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. २३ कोटी मतदारांनी निवडून दिले आहे. कुणाच्या औकातीत नाही हे. कुणाच्या भीकेवर ते पंतप्रधान पद नाही. पळपुट्या माणसाच्या पक्षाने मोदींना चोर म्हणणे सहन करणार नाही. ती तर बाहेरची भूमिका होती. पण सभागृहात मोदींना चोर म्हटले गेले आहे.’
(हेही वाचा – वीर सावरकरांचा अवमान हा देशद्रोहच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले)
Join Our WhatsApp Community