मुंबईतील १० हजार कोटींच्या टँकर पाणी घोटाळ्याची चौकशी होणार; उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा

128

मुंबईतील टँकरच्या पाण्यात होत असलेल्या गैरव्यवहाराची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा नगर विकास खात्यातर्फे मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

( हेही वाचा : राहुल गांधींची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई)

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील पाण्याची लक्षवेधी सूचना उपस्थितीत केली होती. यावेळी आमदार शेलार म्हणाले की, मुंबईत दोन विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 24×7 पाण्याचा प्रकल्प राबविण्यात आला त्यापैकी एक मुलुंड आणि वांद्रे पश्चिमची निवड करण्यात आली. हे दोन्ही प्रकल्प अयशस्वी ठरले. यासाठी १५० कोटी रुपये सल्लागारांना देण्यात आले. तर २५० कोटी कंत्राटदाराला म्हणजे जवळपास ५०० कोटी रूपये खर्च करुन ही हा प्रकल्प महापालिका यशस्वी करु शकली नाही.

उलट वांद्रे पश्चिम येथे जे पाणी मिळत होते त्या वेळेत आणि पाण्याच्या दाबातही बदल करुन ते कमी केले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होते आहे. हे वेळापत्रक बदलून किमान १८ ते २० तास पाणी देणार का? तसेच मुंबईत गळतीमुळे ३० टक्के म्हणजे ५०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते ते वाचवण्यासाठी काही प्रयत्न करणार का? असा प्रश्न आमदार शेलार यांनी उपस्थितीत केला.

मुंबईत १९००० विहिरी असून, त्यामध्ये १२५०० बोअरवेल आहेत. केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, एका बोअरवेल मधून ८० कोटीची चोरी टँकर मधून होते. याचा अर्थ मुंबईत १० हजार कोटीचा पाण्याचा घोटाळा टँकर मार्फत केला जातो. याची चौकशी करणार का? असा प्रश्न आमदार अँड आशिष शेलार यांनी उपस्थितीत केला.

त्यावर उत्तर देताना मंत्र्यांनी टँकर पाणी चोरीची चौकशी केली जाईल, पाणी वाया जाते त्याबद्दल सर्वंकष विचार केला जाईल, तर वांद्रे पश्चिम मधील पाण्याचे वेळापत्रक बदलण्याची सूचना पालिकेला केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच मुंबईतील आमदारांनी पाण्याबाबत विविध तक्रारी केल्या त्यामुळे याबाबत एक बैठक घेऊ, असे मंत्र्यांनी आश्वस्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.