महाराष्ट्र भूषण माझ्यासाठी ‘भारतरत्न’सारखाच – आशा भोसले

174
‘मुलगी बऱ्याच दिवसांनंतर माहेरी आली की, तिचं कौतुक होतं. आज या प्रसंगी मलाही तसंच वाटतंय. कारण मी माझ्या माणसांमध्ये आली आहे. आज मला जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, तो माझ्यासाठी तो ‘भारतरत्न’सारखा आहे. कारण तो माझ्या घरच्यांकडून मिळाला आहे. आणि मी त्यासाठी ९० वर्षे वाट पाहत होती, असे उद्गार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी शुक्रवारी काढले.
आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात चौफेर कामगिरी बजावत, गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले यांना शुक्रवारी, २४ मार्च रोजी राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते.
सन २०२१चा पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेट वे ऑफ इंडियावर एका भव्यदिव्य सोहळ्यात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.

आशा भोसले यांची कारकीर्द

विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांचा जन्म १९३३ साली झाला. संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली १९४३ साली. त्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.  त्यांनी बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवले. बॉलीवूडध्ये तब्बल एक हजारपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना ‘मेलडी क्वीन’ म्हणून ओळखलं जातं. आशाताईंनी आत्तापर्यंत ११ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे २०११ साली आशा भोसले यांचं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत. भोसले यांना १८ वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळाले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.