अदानी कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी कोणाचे? खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधींचा सवाल

229

२०१९ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींनी कर्नाटक दौऱ्यातील एका सभेत ‘सर्व चोरांची आडनाव मोदी कशी काय असतात?’ असा सवाल उपस्थित केला होता. याच वक्तव्यावरून गुरुवारी, गुजरातमधील सुरत जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राहुल गांधींना २ वर्षांनी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. लोकसभा सचिवालयाच्या निर्णयाला नंतर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला. अदानी कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी कोणाचे?, असा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला प्रश्न केला.

नक्की काय म्हणाले राहुल गांधी?

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी अदानी कंपनीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘अदानीची शेल कंपनी आहे. त्यात कोणीतरी २० हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. ते अदानीचे पैसे नाहीत, ते इतर कोणाचे तरी आहेत. त्यामुळे हे २० हजार कोटी रुपये कोणाचे आहेत, हा प्रश्न आहे. मी संसदेत पुरावे घेऊन मीडिया रिपोर्ट्स काढले. मी अदानी आणि मोदींच्या संबंधाबद्दल तपशील बोललो. हे संबंध नवे नाहीत, जुने आहेत. मी याबाबत प्रश्न उपस्थित केला.’

पुढे राहुल गांधी म्हणाले की, ‘मी कशालाही घाबरत नाही. मला तुरुंगात टाकून तुम्ही मला घाबरवू शकत नाही, हा माझा इतिहास नाही. मी भारतासाठी लढत राहीन. मला संसदेत बोलू दिले नाही. संसदेच्या अध्यक्षांना मी तसे पत्रही लिहिले, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. माझे भाषण संसदेतून काढून टाकण्यात आले. पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही.’

‘मी याआधीही म्हटले आहे की, सर्व समाज एक आहे, सर्वांनी एकत्र चालले पाहिजे, बंधुभाव असावा, सर्वांमध्ये प्रेम असावे, द्वेष नसावा, हिंसाचार नसावा. हे प्रकरण ओबीसीचे नाही, तर मोदी आणि अदानीच्या संबंधाचे प्रकरण आहे. मला फक्त याचे उत्तर पाहिजे की, अदानीकडे २० हजार कोटी कुठून आले?,’ असे राहुल म्हणाले.

(हेही वाचा – इतक्या लवकर राहुल गांधींवर कारवाई करण्याची गरज नव्हती; बच्चू कडूंची प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.