गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे जोरदार भाषण झाले. राज ठाकरे बोलतात छान, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. त्यांचे भाषण श्रवणीय असते, विशेषतः तरुणांच्या अंगात सळसळणाऱ्या रक्ताला प्रतिसाद घालणारे असते. राज यांनी गुडी पाडव्याच्या भाषणात अनेक विषयांना हात घातला. त्यांनी हिंदुत्व हाती घेतल्यापासून भोंग्याचा मुद्दा गाजला. आता त्यांनी माहिमच्या मजारीचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
( हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ‘धनुष्यबाण यात्रा’! छत्रपती संभाजीनगरमधून होणार सुरूवात )
डिजिटल मीडियावर राज ठाकरे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरु आहे आणि त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव होत आहे. राज ठाकरे जरी हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीतून आले असले तरी त्यांनी सुरुवातीला त्यांच्या पक्षाचा दृष्टीकोन मराठी असा ठेवला. हिंदुत्वात मराठी सुरक्षित आहे असा विश्वास त्यांना मनसैनिकांमध्ये निर्माण करता आला नाही. आता त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे.
राज ठाकरे यांच्या पक्षाकडे जनतेने दूर्लक्ष केले. जवळजवळ त्यांच्या पक्षाची संवैधानिक (रस्त्यावरील उपद्रवमूल्य नव्हे) शक्ती संपुष्टात येणार होती, तेवढ्यात त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. मात्र लगेच त्यांना हिंदुजननायक म्हणण्याची आवश्यकता नाही. आपल्या पक्षाचे राजकीय अस्तित्व कमकुवत होत असताना त्यांनी शरद पवारांशी व स्वयंघोषित पुरोगाम्यांशी हातमिळवणी केल्याचे आपण सर्वांनीच पाहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कर्तृत्वाद्वारे निर्माण केलेले हिंदुत्वाचे राजकारण आणि पुढे त्या हिंदुत्वाला सावरकरांनी दिलेली व्याख्या या सर्व गोष्टींचा विचार केल्यास राज ठाकरेंसारख्या नवोदित हिंदुत्ववाद्यांना लगेच आपले ह्रदय समर्पित करण्याची मुळीच आवश्यकता नाही. सावरकरी दृष्टीकोनातून राज ठाकरेंची पारख करण्याची गरज आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे का? हे तपासून पाहावे लागणार आहे. केवळ भाषणे ठोकल्यामुळे त्यांना हिंदुजननायक करु नका. त्यांना कामे करु द्या. हिंदूंनी राज ठाकरेंना हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून काही निवेदन व सूचना केल्या पाहिजेत. त्या सूचनांवर ते कशाप्रकारे काम करतात हे पाहिले पाहिजे. या सर्व गोष्टी सावरकरी दृष्टीकोनातून झाल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी राज ठाकरेंवर अविश्वास दाखवण्यासाठी करायच्या नाहीत, तर तो आपला अधिकार आहे आणि नेता हा पारखूनच घ्यावा लागतो. उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी वाटत असताना अचानक स्वयंघोषित पुरोगामी व हिंदुद्रोह्यांच्या कंपुत शिरले. अशा प्रकारचा विश्वासघात पुन्हा होऊ नये म्हणून एवढी काळजी हिंदुत्ववाद्यांनी घ्यायलाच हवी.
Join Our WhatsApp Community