मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत महिममध्ये समुद्रात तयार झालेल्या अनधिकृत बांधकामाचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. यावेळी त्यांनी सरकारने हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे असेही सांगितले होते. त्यांनी ही मागणी केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत सरकारने मुंबई महानगरपालिकेला तसे निर्देश देऊन हे अनधिकृत बांधकाम हटवले होते. त्यानंतर या दोघांमध्ये ही सदिच्छा भेट होत असल्याने या भेटीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे यांची नाशिकच्या मालेगावमध्ये सभा होत असताना, त्या आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी गेले.
आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज ठाकरे यांनी मेळाव्यात सर्वांसह एकनाथ शिंदे यांनाही काही सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीत या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार आहे, याबाबतची उत्सुकता राजकीय वतृळात आहे.
Join Our WhatsApp Community