स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा कठोर शब्दांत निषेध करतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने समाज माध्यमांवर अनोखी मोहीम उघडली आहे. ‘आम्ही सारे सावरकर’ म्हणत शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी वीर सावरकरांचे फोटो डीपी म्हणून ठेवले आहेत. सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नुकतीच सह्याद्री अतिथिगृहावर पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘वीर सावरकर गौरव यात्रे’ची घोषणा केली. या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवेसेनेच्या नेत्यांनी त्यांचे सोशल मीडियावरचे डीपी बदलले आहेत. ‘आम्ही सारे सावरकर’ या टॅगलाइनखाली मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांनी वीर सावरकरांचे फोटो डीपी म्हणून ठेवले आहेत. ‘मी गांधी आहे, सावरकर नाही’, असे अवमानकारक वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेने ‘आम्ही सारे सावरकर’ ही मोहीम हाती घेतली आहे. राज्यभरातील शिवसैनिकांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत ही मोहीम पोहोचवली जाणार आहे.
राहुल गांधींची लायकी नाही – शिंदे
सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट राहुल गांधींची लायकी काढली. शिंदे म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. याचा मी निषेध करतो. राहुल गांधी यांनी एक दिवस अंदमान निकोबारच्या जेलमध्ये राहून दाखवावे. राहुल गांधी यांचा निषेध सर्वांनी करायला हवा. तुम्ही म्हणता मी गांधी आहे, सावरकर नाही. तुमची लायकी सुद्धा नाही, सावरकर होण्याची,’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
(हेही वाचा – राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची घोषणा)
Join Our WhatsApp Community