जी-२० कार्यगटाची मुंबईत तीन दिवस बैठक; जगभरातील १०० प्रतिनिधी सहभागी होणार

169

भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील जी-२० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची पहिली बैठक मंगळवार २८ ते गुरुवार ३० मार्चदरम्यान मुंबईत होणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याविषयक चर्चेत, जी-२० सदस्य गटांचे १०० हून अधिक प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी, प्रादेशिक समूहांचे तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी ५० पेक्षा अधिक प्रतिनिधींचे सोमवारी मुंबईत आगमन झाले आहे.

बैठकीच्या पहिल्या दिवशी, २८ मार्च रोजी, ‘व्यापार आणि वित्तीय सहकार्य” या विषयावर एक आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. व्यापार आणि वित्तपुरवठा यातील तफावत कमी करण्यासाठी, बँका, वित्तीय संस्था, विकास वित्तीय संस्था आणि निर्यात पतसंस्था यांची भूमिका तसेच व्यापारविषयक वित्तपुरवठ्याचे सहाय अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल यावर या परिषदेतील दोन सत्रात सविस्तर चर्चा होईल. भारतातील तसेच परदेशातील या क्षेत्रात नामवंत तज्ञांना या बैठकीत विचार मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

परिषदेसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना त्यानंतर ‘भारत डायमंड बोर्स’ या मुंबईतील हिरे व्यापार उद्योगाची भेट घडविली जाईल. जी-२० च्या व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठकीदरम्यान, भारतीय चहा महामंडळ, भारतीय कॉफी महामंडळ, भारतीय मसाले महामंडळ आणि इतरांनी तयार केलेले चहा, कॉफी, मसाले आणि भरड धान्य यांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडवणारे एक प्रदर्शन बैठकीत मांडले जाणार आहे. त्याचबरोबर भारतीय वस्त्रांचे प्रदर्शन देखील आयोजित केले जाणार आहे.

बैठकींची रुपरेषा अशी…

  • २९ मार्च रोजी, जी-२० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाच्या बैठकीचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होईल. जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित प्राधान्यक्रम, ज्याचा भारत जी-२० चा अध्यक्ष या नात्याने पाठपुरावा करत आहे, त्यासंदर्भातील चार तंत्रज्ञानविषयक सत्रांमध्ये २९ आणि ३० मार्च रोजी चर्चा केली जाईल. २९ मार्च रोजीच्या सत्रात, विकास आणि समृद्धीसाठी व्यापाराला चालना आणि लवचिक जागतिक मूल्य साखळी निर्माण करण्यावर चर्चेचा प्रामुख्याने भर असेल. तसेच समावेशक आणि लवचिक विकासासाठी, जागतिक मूल्य साखळीत विकसनशील देशांचा आणि ग्लोबल साउथचा सहभाग वाढवण्यासाठी आणि भविष्यातील संकटांना सामोरे जाण्यासाठी लवचिक जागतिक मूल्य साखळी तयार करण्यासाठी सामायिक उद्दिष्ट साध्य करण्यावर भर दिला जाईल.
  • ३० मार्च रोजी आयोजित, बैठकीच्या दोन सत्रांमध्ये, जागतिक व्यापारात एमएसएमईचे एकात्मीकरण तसेच व्यापारासाठी कार्यक्षम लॉजिस्टिक व्यवस्था उभारण्याला प्राधान्य अशी दोन सत्रात चर्चा केली जाईल. विकसित आणि विकसनशील अशा दोन्ही देशांमधील उपजीविका टिकवून ठेवण्याला प्राधान्य देणे आणि जागतिक व्यापारात एमएसएमईचे एकात्मीकरण यांना यापूर्वी जी 20 अध्यक्ष असलेल्या देशांनी केलेले कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचा भारताचा मानस आहे. विविध देशांच्या सीमांदरम्यान आणि देशांतर्गत दुर्गम भागात वाहतुकीवरील खर्च कमी होऊ शकेल अशी मजबूत लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या उपायांवर देखील जी-२० प्रतिनिधी चर्चा करतील.

(हेही वाचा – वीर सावरकरांनी माफी मागितलेली कागदपत्रे दाखवा; रणजित सावरकर यांचे राहुल गांधींना आव्हान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.