धुळे आणि नवी मुंबई येथून आपल्या समस्या घेऊन मंत्रालयात आलेल्या दोन महिलांनी सोमवारी मंत्रालयासमोर कीटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोघींना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी एका महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. या दोघी आपल्या समस्या घेऊन मंत्रालयात आल्या होत्या, त्या ठिकाणी त्यांना एक व्यक्ती भेटली होती, त्या व्यक्तीने स्वतःला समाजसेवक असल्याचे सांगून तुम्ही मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला तरच तुम्हाला न्याय मिळेल असा सल्ला त्याने या दोघींना दिला होता. त्याचं सल्ल्यावरून या दोघींनी कीटकनाशक द्रव्य घेतले अशी माहिती समोर आली आहे. या समाजसेवकाचा आम्ही कसून शोध घेत असल्याची महिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी दिली आहे.
शीतल गादेकर आणि संगीता डावरे अशी सोमवारी दुपारी मंत्रालयासमोर कीटकनाशक प्राशन करणाऱ्या महिलांची नावे आहेत. शीतल गादेकर या महिलेचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतल गादेकर धुळे जिल्ह्यातील राहणाऱ्या असून संगीत डावरे या नवी मुंबई येथे राहणाऱ्या आहेत. या दोन्ही महिलांच्या समस्या वेगवेगळ्या होत्या, आणि दोघी एकमेकांना ओळखत देखील नव्हत्या. शीतल गादेकर यांच्या पतीच्या निधनानंतर पतीच्या मित्राने त्यांची जमीन बळकावली होती, यासंदर्भात त्या मागील २०२० पासून पाठपुरावा करीत असून त्यांना कुठेही न्याय मिळत नसल्यामुळे त्या सोमवारी न्याय मागण्यासाठी मंत्रालयात आल्या होत्या. तसेच संगीता डावरे या नवी मुंबई येथे राहणाऱ्या आहेत, त्यांचे पती हे पोलीस दलात पोलीस शिपाई आहेत. शस्त्रक्रिये दरम्यान संगीता डावरे यांच्या पतीचा पाय निकामी झाल्यामुळे डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्या मंत्रालयात आल्या होत्या. दरम्यान दोन्ही महिला एकाच वेळी एका कथित समाजसेवकाच्या संपर्कात आल्या आणि या समाजसेवकाने त्यांना मंत्रालयासमोर कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करा तेव्हाच तुमच्याकडे लक्ष वेधले जाईल असा सल्ला दिला होता अशी माहिती समोर आली.
सोमवारी दुपारी या दोघी तोंडाला मास्क लावून एकाच टॅक्सीतून मंत्रालयाजवळ आल्या होत्या. यादरम्यान या दोघींनी कीटकनाशक द्रव्य प्राशन केले. ही बाब मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी दोघींना तात्काळ उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात केले. दोघींवर उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी शीतल गादेकर या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघी महिलांनी २७ मार्च रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा यापूर्वी दिला होता. तसेच या महिला भेटलेला कथित समाजसेवकाने त्यांना कीटकनाशक द्रव्य पिण्याचा सल्ला दिला होता, तसेच कीटकनाशक द्रव्याच्या बॉटलचे झाकण उघडूनच त्या दोघी आलेल्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिलांना आत्महत्येचा सल्ला देणारा कथित समाजसेवकाची माहिती मिळवून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. त्याच्या विरुद्ध पुरावे मिळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील करण्यात येईल अशी माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांनी दिली.
(हेही वाचा – लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने ज्वेलर्स मालकाला धमकी)
Join Our WhatsApp Community