मुंबईकरांना आता ‘डिजीलॉकर’ मध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

२८ जानेवारी २०१६ नंतर विवाह नोंदणी केलेल्यांना मिळणार सुविधा

116

पेपरलेस कामकाजाकडे वेगाने वाटचाल करत असलेल्या महानगरपालिकेने मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणखी एक ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. केंद्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचा उपक्रम असलेल्या ‘डिजीलॉकर’ या ऑनलाईन शासकीय व अधिकृत कागदपत्रांच्या ऍपमध्ये आता मुंबईकर नागरिकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्त करुन जतन करता येईल. मुंबई महानगरपालिकेकडे २८ जानेवारी २०१६ नंतर विवाह नोंदणी केलेल्यांना ही सुविधा मिळणार आहे.

( हेही वाचा : मुंबई – पुणे प्रवास महागला! १ एप्रिलपासून टोलमध्ये तब्बल १८ टक्के वाढ)

महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या हस्ते या सुविधेचे मंगळवारी २८ मार्च २०२३ रोजी लोकार्पण करण्यात आले. महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक शरद उघडे, माहिती तंत्रज्ञान खात्याचे व्यवस्थापक मीनल शेट्ये, डेनिस फर्नांडिस यावेळी उपस्थित होते.

विवाह नोंदणी प्रमाणपत्र हा विवाहितांसाठी महत्वाचा वैयक्तिक दस्तऐवज समजला जातो. पासपोर्ट, व्हिसा आणि इतर अनेक शासकीय कामकाजासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची गरज भासते. महानगरपालिकेकडे सन २०१० पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्र विषयक कामकाज सुरु झाले असले तरी जानेवारी २०१६ पासून विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे कामकाज ऑनलाईन करण्यात आले. त्याच्या पुढे जावून आता महानगरपालिकेकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र डिजीलॉकरमध्ये देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र प्रत्यक्ष बाळगण्याची गरज भासणार नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचे कामकाज ऑनलाईन झाल्याच्या तारखेपासून म्हणजे दिनांक २८ जानेवारी २०१६ नंतर महानगरपालिकेकडे विवाह नोंदणी केलेल्यांना ही सुविधा मिळणार आहे. विवाहाचे वर्ष कोणतेही असले तरी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र उपलब्ध होते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. अशा रितीने आजपर्यंत महानगरपालिकेकडे वैवाहिक नोंदणीची संख्या तीन लाख ८० हजार ४९४ इतकी आहे.

अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे म्हणाल्या की, डिजीलॉकर ही केंद्र सरकारद्वारे उपलब्ध करुन दिलेली शासकीय कागदपत्र मिळवण्याची ऑनलाईन व पेपरलेस सेवा आहे. या सेवेचा उद्देश नागरिकांना मोबाईलमध्येच ऍपद्वारे त्यांच्या वैयक्तिक दस्तऐवजासाठी इलेक्ट्रॉनिक जागा उपलब्ध करून देणे हा आहे. डिजी लॉकरमधील शासकीय कागदपत्रांना प्रत्यक्ष कागदपत्रांइतकाच अधिकृत व कायदेशीर दर्जा असतो. स्वाभाविकच, डिजी लॉकरमध्ये शासनाने उपलब्ध करुन दिलेले दस्ताऐवज पेपरलेस स्वरुपात कुठेही, कधीही व सुरक्षितपणे उपलब्ध होवू शकतात. अशी कागदपत्रं प्रत्यक्ष बाळगण्याची गरज शिल्लक राहत नाही. त्यामुळे डिजी लॉकरची लोकप्रियता व सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपयुक्तता प्रचंड आहे. त्यामुळेच महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेनेही विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची सुविधा डिजी लॉकरमध्ये पुरवली आहे. विवाह प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेचे डिजिटायझेशन करून नागरिकांवरील ओझे कमी करून त्यांना या महत्त्वाच्या कागदपत्रापर्यंत पोहोचणे सोपे व्हावे, हा महानगरपालिकेचा उद्देश आहे, असे भिडे यांनी नमूद केले.

माहिती तंत्रज्ञान संचालक शरद उघडे म्हणाले की, विवाह नोंदणी प्रमाणपत्र डिजीलॉकरमध्ये पुरवण्याचा हा उपक्रम महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या सहकार्याने राबवला आहे. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.  मंगला गोमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी सहकार्य केले आहे. यापुढे इतरही खात्यांच्या सेवा अशारितीने डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करुन देण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. महानगरपालिका प्रशासन अधिक नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने महानगरपालिकेचा माहिती तंत्रज्ञान विभाग कामकाज करत आहे. पेपरलेस आणि पारदर्शक कामकाजासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. यानिमित्ताने मुंबईकर नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि आवश्यक असेल त्यावेळी सुलभ प्रवेशासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र डिजी लॉकरवर संग्रहित करावे. प्रशासन अधिक डिजीटल, पारदर्शक व कार्यक्षम करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे, असे शरद उघडे यांनी नमूद केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.