पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तर्फे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरू असताना, मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथील मुंबई महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई –२’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती लागली होती. त्यामुळे २७ मार्च २०२३ पासून पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले होते. दिवसरात्र काम करत ही गळती रोखण्याचे काम बुधवारी पहाटे विक्रमी वेळेत यशस्वी केले. सलग ३६ तास चाललेल्या कामानंतर बुधवारी २९ मार्च २०२३ रोजी पहाटे ५ वाजता हे काम पूर्ण झाले. जल अभियंता विभागाने जाहीर केलेल्या वेळेच्या १५ तास आधीच मुंबई -२ जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
सोमवार, २७ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजेपासून बुधवार, २९ मार्च २०२३ रोजी रात्री १० पर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागात १५ टक्के पाणी कपात करण्यात आले होते. परंतु, पालिकेच्या जल अभियंता विभागाने नियोजित वेळेच्या १५ तास आधीच काम पूर्ण केले.
एरव्ही जलवाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी पूर्णपणे पाणीपुरवठा थांबवून काम करणे गरजेचे असते. परंतु, पालिकेच्या जल अभियंता विभागाने मुंबईसाठीच्या पाणीपुरवठ्यात किमान पाणी कपात करत अतिशय आव्हानाचे काम किमान वेळेत पूर्ण केले आहे. मुंबई २ जलवाहिनीवर काम पूर्ण झाल्याने बुधवारी पहाटेपासूनच पाणीपुरवठा पूर्ववत करण्यास सुरुवात झाली आहे. जल अभियंता विभागाने हे आव्हानात्मक काम विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी जल अभियंता विभागाचे कौतुक केले आहे. मुंबईतील नागरिकांनी केलेल्या सहकार्यासाठी जल अभियंता पुरूषोत्तम माळवदे यांनी नागरिकांचे आभार मानले आहेत.
अतिशय आव्हानात्मक स्वरूपाचे हे काम करण्यासाठी पालिकेच्या चमुने अतिशय मेहनत घेतली. पालिकेने या कामासाठी परिरक्षण विभाग,नगर बाह्य विभाग आणि आपत्कालीन विभागाचा चमू तैनात केला होता. एकूण १२ अभियंता आणि ३० कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे काम पूर्ण करण्यात आले. सलग ३६ तास दिवसरात्र हे जलवाहिनी दुरूस्तीचे काम चालले होते. या कामात पाण्याचा दाब (प्रेशर) असतानाही काम करण्याचे आव्हान होते. जलवाहिनीतून गळती झालेल्या पाण्यातच हे दुरूस्तीचे काम चालले. हे काम पहाटे ५ वाजता हे काम पूर्ण करण्यात जल अभियंता विभागाला यश आले. त्यामुळे मुंबईतील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठीची सुरूवात झाली आहे.
(हेही वाचा – मुंबईकरांना आता ‘डिजीलॉकर’ मध्ये मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र)
Join Our WhatsApp Community