दुरुस्तीच्या कामामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरून १ एप्रिलपासून वाहनांना बंदी

115

मुंब्रा बाह्यवळण (बायपास) रेतीबंदर जवळील रस्त्याच्या (प्ररामा 4) दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे जे. एन. पी. टी, कळंबोलीकडून भिवंडी, नाशिक, गुजरात आणि उत्तर भारतात जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुंब्रा बायपास बाह्यवळण रस्ता पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याने या मार्गावरून येणारी जाणारी वाहतूक बाधित होणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत १ एप्रिलपासून बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी कळविले आहे.

पोलीस आयुक्त सिंह यांनी काढलेल्या सूचनेत म्हटले आहे की, ठाणे शहर अंतर्गत परिसरातून राज्यांतर्गत व बाहेरील राज्यातून मुंब्रा बायपास मार्गे जे.एन.पी.टी., कळंबोली नवी मुंबईकडून भिवंडी, नाशिक, गुजरातकडे राज्य महामार्ग क्र. ३ अथवा घोडबंदर रोडने जड-अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. मुंब्रा बायपास रेतीबंदर जवळील मुंब्रा कौसा बाह्यवळण रस्ता प्र.रा.मा-४ १३९/२०० ते १३९/८१० मधील रेल्वे उड्डाणपुलाची दुरुस्ती व पुलाच्या स्लॅबवर उच्चशक्ती काँक्रीटचा ओव्हरले करण्याचे काम सुरू होणार आहे. तसेच खारेगाव व साकेत पुलाचे मास्टीक पध्दतीने डांबरीकरण व क्षतिग्रस्त एक्सपांशन जॉईंट्स दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे 

प्रवेश बंद :- जे.एन.पी.टी./कळंबोली, नवी मुंबई कडून येणारी वाहने तसेच दक्षिण भारतातून पुणे मार्गे तळोजा कडून कल्याण फाटा व शिळफाटा मुंब्रा बायपास मार्गे नाशिक गुजरात, भिवंडी, उत्तर भारतात जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुंब्रा बायपासकडे जाण्यास शिळफाटा येथून पूर्णवेळ प्रतिबंध करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील जे.एन.पी.टी./कळंबोली, उरण मार्गे महापे सर्कलकडून शिळफाटा मार्गे गुजरात भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिळफाटाकडे येण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे.

पर्यायी मार्ग :- अ) कळंबोली – शिळफाटा येथून डावे वळण घेवून – महापे हॉटेल पार्टीका सरोवर – समोरून वळण घेवून रबाळे एम.आय.डी.सी. मार्गे रबाळे नाका – ऐरोली पटणी सर्कल- डावीकडे वळून घेवून ऐरोली सर्कल उजवीकडे वळण घेवून मुलुंड ऐरोली ब्रिज वरून ऐरोली टोलनाका मार्गे उजवीकडे वळण घेवून – पूर्व द्रुतगती महामार्गे मुलुंड आनंदनगर टोलनाका – माजीवाडा – घोडबंदर रोडने – गायमुख मार्गे गुजरात दिशेने मार्गस्थ होतील.

तसेच भिवंडीकडे जाणारी वाहने

ब) वरील मार्गाने माजीवाडा – कापूरबावडी सर्कल उजवे वळण घेवून कशेळी – काल्हेर – अंजूर चौक – येथून भिवंडी कडे मार्गस्थ होतील. या वाहनांना रात्री २२:०० ते ५:०० दरम्यान प्रवेश देण्यात येत आहे.

क) परंतू वरील मार्गाने कापूरबावडी-साकेत ब्रिज तसेच कळवा खारेगांव खाडी ब्रिजचे काम चालू होईपर्यंत भिवंडी शहराकडे येणाऱ्या वाहनांना माजिवडा मार्गे – साकेत ब्रिज – खारेगाव खाडी ब्रिज – माणकोली मार्गे भिवंडी गोडाऊन परिसराकडे जाण्यास दिवसा १२.०० ते १६:०० तसेच रात्री २२.०० ते ५.०० दरम्यान प्रवेश देण्यात येईल.

तसेच नाशिकडे जाणारी वाहने :- ड) जे. एन. पी. टी – डी पॉईंट – पळस्पे फाटा येथून डावे वळण घेवून – जुना मुंबई पुणे रोडने कोनब्रिज उतरल्यानंतर डावीकडे वळण घेवून – मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाने खालापूर टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

नाशिककडून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद – नाशिक, राष्ट्रीय महामार्ग क्र. ३. जे. एन. पी. टी. नवी मुंबईकडे जाणारी जड-अवजड वाहनांना शहापूर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग – शहापूर येथून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरून डावीकडे वळून – सापगाव – मुरबाड- कर्जत-चौक फट-डिपॉईंट-जे.एन.पी.टी. नवी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी २४ तास (दिवस व रात्री) एक दिशा मार्ग (ONE WAY) करण्यात येणार आहे.

गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ अहमदाबाद, गुजरातकडून जे. एन. पी. टी. नवी मुंबई, नाशिक व पुणे मार्गे दक्षिण भारतात जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मुंब्रा बायपास मार्गे प्रतिबंध करण्यात आले आहे.

पर्यायी मार्ग – अ) मनोर (टेन नाका) येथून डावे वळण घेवून – पोशेरी-पाली- वाडा नाका- शिरीषपाडा येथून डावे वळण घेवून – अबिटघर – कांबरे येथून उजवे वळण घेवून – पिवळी – केल्हे – दहागाव मार्गे वाशिंद येथून नाशिकच्या दिशेने तसेच भिवंडी करिता जाण्यासाठी २४ तास (दिवस रात्री) एक दिशा मार्ग (ONE WAY) करण्यात आले आहे.

ब) भिवंडी शहरातून ठाणे आनंदनगर चेकनाका मार्गे जे.एन.पी.टी. नवी मुंबई जाण्यास – वाहनांना दिवसा १२:०० ते १६०० पर्यंत तसेच रात्री २२:०० ते ५:०० दरम्यान प्रवेश देण्यात येणार आहे.

क) चिंचोटी मार्गे अंजूर फाटा, भिवंडी – जे.एन.पी.टी. नवी मुंबई करीता रात्रौ २२:०० ते ५:०० दरम्यान प्रवेश देण्यात येणार आहे.

ड) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८- अहमदाबाद, गुजरात कडून जे. एन. पी. टी. नवी मुंबई, पुणे मार्गे दक्षिण भारतात जाणारी जड-अवजड वाहनांसाठी घोडबंदर मार्गे माजीवाडा -आनंदनगर -ऐरोली – नवी मुंबई मार्गे जाण्यास रात्री २२:०० ते ०५:०० दरम्यान प्रवेश देण्यात येत आहे.

ही वाहतूक नियंत्रण अधिसुचना १ एप्रिल २०२३ पासून काम संपेपर्यंत अंमलात राहणार आहे. ही वाहतूक अधिसूचना मुंब्रा कौसा बाह्यवळण तसेच साकेत ब्रिज तसेच खारेगांव खाडी ब्रिज रस्ता दुरुस्तीकरिता माल ने-आण करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवेतील हलकी चार चाकी वाहने ही जुना पुणे-मुंबई रोड राष्ट्रीय महामार्ग क्र.4 चा वापर करतील. शिळफाटा ते मुंब्रा रेतीबंदर येथून चार चाकी हलकी वाहने मुंब्रा शहरातून जुना पुणे-मुंबई रोडने ये-जा करतील. तसेच मुंब्रा शहरामध्ये जीवनावश्यक माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्यात आले आहे. ह्या अधिसूचनेचा भंग करणाऱ्या मोटर वाहन चालकाविरुध्द मोटर वाहन कायदा १९८८ कलम १७९(१) अन्वये कारवाई करण्यात येईल, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी सांगितले.

(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा; पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ आणि हवेत गोळीबार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.