मुंबईला सलग दुसऱ्यांदा ‘जागतिक वृक्षनगरी’चा मिळाला बहुमान

142

मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर जागतिक मोहोर उमटली आहे. “जागतिक वृक्ष नगरी २०२२” या यादीमध्ये मुंबई महानगराचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मागील दोन वर्षात विविध उपक्रम राबवून वृक्ष संवर्धन व नागरी वनीकरण यास चालना दिली आहे. या योगदानामुळे मुंबईला हा सन्मान मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

संयुक्त राष्ट्र संघाची विशेष संस्था असलेली अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization) ही संस्था जगभरात अन्नाची टंचाई कमी करणे तसेच भूकबळींचे प्रमाण रोखणे या उद्दिष्टासाठी कार्यरत आहे. तर मागील सुमारे ५० वर्षाहून अधिक काळ जगभरात वृक्ष लागवड व संवर्धन करीत असलेल्या आर्बर डे फाउंडेशन या अमेरिका स्थित संस्थेने आजवर तब्बल ३५ कोटींहून अधिक झाडे लावली आहेत. एवढेच नव्हे तर सन २०२७ पर्यंत जगभरात मिळून ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे या फाउंडेशनचे लक्ष्य आहे.

सन २०१९ मध्ये या दोन्ही संस्था एकत्र आल्या. त्यांनी जगभरात वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणाऱ्या, त्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवणाऱ्या शहरांचा गौरव करण्याची मोहीम हाती घेतली. वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन टिकून राहावे, यासाठी जगभरात कोणकोणते प्रयत्न सुरू आहेत, याचा देखील सदर मोहिमेत शोध घेवून त्यावर सतत संशोधन केले जाते. या निकषांवर खरे उतरणाऱ्या शहरांची जागतिक वृक्षनगरी यादी घोषित करून त्यांना गौरविण्यात येते. अशा रीतीने या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २०१९ पासून हा बहुमान सुरू करण्यात आला आहे.

मुंबईला सन २०२१ मध्ये सर्वप्रथम हा बहुमान देण्यात आला होता आणि आता सन २०२२ साठी म्हणजे सलग दुसऱ्यांदा ’जागतिक वृक्ष नगरी २०२२’ (Tree Cities of The World 2022) बहुमान प्रदान करण्यात आला आहे. आर्बर डे फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी डॅन लॅम्बे व अन्न आणि कृषी संघटनेच्या वने विभागाचे सहायक संचालक हिरोटो मित्सुगी यांच्या स्वाक्षरीनिशी या बहुमानाचे प्रमाणपत्र महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आले आहे.

हा बहुमान प्राप्त करताना मुंबईने पाच मानांकनाची पूर्तता केली आहे. झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, नागरी वने आणि झाडांचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी नियम निश्चित करणे, स्थानिक वृक्ष संपदेची अद्ययावत यादी किंवा मूल्यांकन राखणे, वृक्ष व्यवस्थापन योजनेसाठी संसाधनांचे वाटप करणे आणि नागरिकांना शिक्षित करण्यासाठी वार्षिक वृक्ष उत्सव आयोजित करणे, अशी ही महत्वाची पाच मानांकने आहेत.

या बहुमानाच्या रूपाने नागरी वनीकरणाच्या सर्वोत्तम पद्धतींना चालना देणाऱ्या आंतरराष्ट्रीय शहरांच्या यादीत मुंबईचा पुन्हा एकदा समावेश झाला आहे. मुंबईतील वृक्षांची योग्य देखभाल, नवीन वृक्षलागवडीसाठी सातत्य, नागरी वनांची व्यापक अंमलबजावणी अशा प्रयत्नांमुळेच मुंबई नगरी वृक्ष समृद्ध आहे, हे जगाच्या नजरेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सलग दुसऱ्यांदा मुंबई महानगराची जागतिक वृक्ष नगरी बहुमानासाठी निवड होणे, ही बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संपूर्ण मुंबईकरांसाठी देखील अभिमानाची बाब आहे. कारण वृक्ष संपदा पर्यायाने पर्यावरण संतुलन टिकून राहावे, यासाठी महानगरपालिका प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांना मुंबईकरांच्या लोकसहभागातून पाठबळ लाभते. त्याचे हे फळ आहे, अशी भावना उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी व्यक्त केली. भविष्यातही मुंबई महानगर अधिकाधिक पर्यावरणस्नेही आणि हिरवळीने बहरलेले राखता येईल, यासाठी अधिक जोमाने कामकाज करण्याची प्रेरणा यातून मिळाल्याचे देखील परदेशी यांनी नमूद केले.

(हेही वाचा – मुंबईत सुमारे १९ हजार इलेक्ट्रीक वाहनांची नोंदणी; आणखी दहा सार्वजनिक वाहनतळांमध्ये उभारणार चार्जिंग स्टेशन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.