छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या राड्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून हा हिंसाचार घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राऊतांना चांगलेच सुनावले आहे.
बावनकुळे म्हणाले काय म्हणाले?
संजय राऊतांच्या आरोपावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘संजय राऊत वाह्यातपणा करतायत. महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. सकाळी ९ वाजता राऊतांचा भोंगा चालू होतो आणि महाराष्ट्राचे वातावरण बिघडवतो. त्यामुळे येत्या काळात संभाजीनगरमध्ये अशा घटना घडल्या, तर संजय राऊतांना यात आरोपी केले पाहिजे, गरज पडली तर.’
संजय राऊत काय म्हणाले होते?
राऊत म्हणाले होते की, ‘संभाजीनगरला २ एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आहे. ती सभा होऊ नये किंवा कायदा, सुव्यवस्थेच्या कारणाखाली ती सभा होऊ नये, त्या सभेला परवानगी मिळू नये. कायदा, सुव्यवस्थेचे कारण द्यायचे, तणावपूर्ण वातावरण आहे, भडका उडू शकतो, हे कारण पुढे करून सभेला परवानगी नाकारायची. सभा होऊन द्यायची नाही, हे कारस्थान आहे.’
फडणवीस म्हणाले होते की….
‘काही लोकांना प्रयत्न आहे की, त्याठिकाणी भडकवणारे वक्तव्य करून परिस्थिती अजून चिघळली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये नेत्यांनी कसे वागल पाहिजे, हे देखील समजून घेतले पाहिजे. त्यामुळे कोणी जर अशाप्रकारचे चुकीचे वक्तव्य करत असेल, तर त्यांनी करू नये. सगळ्यांनी शांतता पाळावी. आपले शहर शांत ठेवण्याची जबाबदारी ही सगळ्या नेत्यांची आहे. पण याला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नाही,’ असे फडणवीस म्हणाले होते.
(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमधील राड्यात एकाचा मृत्यू; ६ जणांना अटक)
Join Our WhatsApp Community