रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री रस्त्यावर उतरणार

163

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा एक भाग म्हणून रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची १११ कामे हाती घेतली आहेत. या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही आगामी काळात प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी देत काँक्रिटीकरणासह रस्त्यांची इतरही सर्व कामे योग्यरितीने होत आहेत, याकडे रस्ते विभागाने लक्ष ठेवावे, अशी सूचना आयुक्तांनी केली. त्यामुळे मुंबईकरांना खड्डे मुक्त रस्ते देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री विशेष लक्ष ठेवून आहेत.

मुंबई महानगरपालिकेचा विशेष प्रकल्प असलेला मुंबई सुशोभिकरण प्रकल्प, यंदाच्या पावसाळ्यापूर्वी करावयाची विविध कामे, तसेच जी २० परिषदेच्या आगामी बैठका या सर्व पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाकडून प्रगतिपथावर असलेली तसेच नियोजित कामे यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी ३१ मार्च २०२३ रोजी आढावा बैठक घेतली, या बैठकीस महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

(हेही वाचा कर्नाटकात मुसलमानांचे आरक्षण रद्द; बोम्मई सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचा निर्णय )

महानगरपालिका आयुक्त चहल यांनी सर्वप्रथम नुकत्याच पार पडलेल्या जी20 परिषदेच्या व्यापार व गुंतवणूक सहकार्य गटाच्या बैठकीसाठी महानगरपालिकेने केलेल्या कामांचा संदर्भ देत नमूद केले की, मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या जी २० परिषदेसाठी महानगरपालिकेने महानगरातील सुशोभीकरण कामांच्या माध्यमातून एक नवा आदर्श देशातील इतर शहरांसमोर ठेवला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये मुंबईत पार पडलेल्या पहिल्या बैठकीवेळी केलेल्या कामांपेक्षा देखील अधिक उत्कृष्ट कामे यावेळी करण्यात आली. महानगरपालिकेने आपली कामगिरी उंचावत केलेल्या कामांमुळे केंद्र आणि राज्य शासनाने देखील महानगरपालिकेचे कौतुक केले आहे. त्याबद्दल संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अभिनंदनास पात्र आहे, असे सांगतानाच फक्त जी २० परिषदेपुरती अशी कामगिरी मर्यादित न राहता, मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाच्या माध्यमातून या कामांचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना कायमस्वरुपी आला पाहिजे, त्याची दक्षता विभागीय पातळीवर घेण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्तांनी केली.

पावसाळापूर्व कामांना वेग देणार

मार्च महिन्यात नुकताच झालेला पाऊस हा मागील आठ दशकांमध्ये महिन्यात झालेला सर्वाधिक पाऊस ठरला. वातावरणीय बदलांमुळे हवामानाच्या लहरीपणाचा फटका संपूर्ण जगाला बसतो आहे आणि मुंबईलाही त्याचे अनुभव येत आहेत. अशा स्थितीत यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील लहान-मोठ्या सर्व नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने आणि योग्यरितीने पूर्ण करावीत, जी20 परिषद – मुंबई सुशोभिकरण व नियमित देखभालीची कामे यामुळे रस्त्यांच्या पुनर्पुष्ठीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असली तरी त्यांचा आढावा घेवून रस्त्यांची कामे जलदगतीने करावीत, त्यासाठी सहायक आयुक्त आणि परिमंडळ स्तरावर उपायुक्तांनी आपल्या विभागातील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देश आयुक्त चहल यांनी दिले. प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर पावसाळापूर्व कामांची लवकरच बैठक घेतली जाईल असे नमूद करुन मुंबईकरांना यंदाच्या पावसाळ्यात कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठीची सर्व ती खबरदारी घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.