हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कायम त्यांची बातमी जशीच्या तशी प्रसिद्ध व्हावी, अशी इच्छा असते परंतु माध्यमे नेमकी त्याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध करतात, कारण आज मीडियात ८० टक्के मनुष्यबळ डाव्या विचारांचे आहे, तुमची बातमी पत्रकार, उपसंपादक लावू शकत नाही, त्याचे अधिकार संपादकाला असतात. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ विचारांचे पत्रकार बनवण्याचा कारखाना सुरू करा आणि संपादक पातळीवर हिंदुत्वनिष्ठ विचारांचे संपादक निर्माण करा, असे आवाहन हिंदुस्थान पोस्टचे संपादक स्वप्नील सावरकर यांनी केले.
हिंदू जनजागृती समितीच्या प्रांतीय हिंदू अधिवेशनात ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रसार माध्यमांशी संपर्क कसा ठेवावा? या विषयावर उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना स्वप्नील सावरकर म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रसार माध्यमे आणि स्वातंत्र्यानंतरची प्रसारमाध्यमे निराळी आहेत. तेव्हा माध्यमे व्यवसाय नव्हता, आता तो व्यवसाय बनला आहे. आता माध्यमे तर व्यावसायिकांचे शस्त्र बनले आहेत. म्हणून मीडियाचे मालक व्यापारी बनले आहेत. आज कोणत्याच मीडियाचे मालक संस्था राहिल्या आहेत, याला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ‘हिंदुस्थान पोस्ट’ हे मीडिया हाऊस अपवाद आहे, असेही स्वप्नील सावरकर म्हणाले. यावेळी स्वप्नील सावरकर यांनी प्रसिद्धीपत्रक काढताना कोणती काळजी घ्यायची, आंदोलनाचे प्रसिद्धीपत्रक वर्तमानपत्रांसाठी बनवताना आणि वृत्तवाहिन्यांसाठी व्हिडीओ क्लिप बनवताना काय काळजी घ्यायची, याचेही मार्गदर्शन केले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पत्रकारापासून ते संपादकांपर्यंत स्वतःची संपर्क यंत्रणा करावी, याविषयीही मार्गदर्शन केले.