छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकारण तापले; एकीकडे महाविकासची सभा दुसरीकडे भाजपाची सावरकर गौरव यात्रा

122

छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची रविवारी, २ एप्रिल रोजी एकत्र सभा होत आहे. विशेष म्हणजे अशाच सभा राज्यभरात होणार असून, पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. या ‘वज्रमुठ सभे’ला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाकरे कुटूंबाची सभेची परपंरा असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर महाविकास आघाडीची सभा होत आहे. साधारण संध्याकाळी 5 वाजता या सभेला सुरूवात होईल. त्यासाठी दुपारी दोन वाजेपासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी येण्यास सुरूवात होईल. त्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत परिसरातील वाहतुकीतदेखील मोठा बदल केला आहे. तर या सभेसाठी महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली आहे.

(हेही वाचा एप्रिलमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात येणार उष्णतेची लाट! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?)

भाजप-शिंदे गटाची (शिवसेना) सावरकर गौरव यात्रा

एकीकडे महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर शहरात जाहीर सभा होत असताना, दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे शहरात सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. स्वातंत्रवीर सावरकर चौक समर्थनगर येथून या यात्रेला सुरुवात होऊन, निराला बाजार मार्गे महात्मा फुले चौक, औरंगपुरा गुलमंडी मार्गे, उत्तम मिठाई भंडार भाटी बजार, पांदरीबा, अप्पाहलवाई मिठाई संस्थान गणपती मंदिर समारोप होईल. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.