तरुणींना बाईकवर बसवून स्टंटबाजी करणारा निघाला तडीपार गुंड, पोलिसांकडून अटक!

98

तरुणींना मोटारसायकलवर बसवून मुंबईतील रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्या स्टंटमॅनला मुंबईतील साकिनाका येथून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या स्टंटमॅनवर मुंबईतील वडाळा, दादर टीटी, अंटोप हिल पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे, त्याला तडीपार करण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे.

फैय्याज अहमद आजीमुल्ला कादरी (२४) असे अटक करण्यात आलेल्या स्टंटमॅनचे नाव आहे. वडाळा येथील संगम नगर परिसरात राहणाऱ्या फैय्याज याला हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. मुंबई शहरातील वांद्रे -कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे रिक्लेमेशन, तसेच पश्चिम द्रुतगती आणि द्रुतगती महामार्ग, फ्री वेच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात बाईकर्स खतरनाक स्टंट करतात आणि त्याचे व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जातात.

स्टंट करणाऱ्या बाईकर्सचे अनेक ग्रुप असून या ग्रुपमध्ये शेकडोंच्या घरात स्टंटमॅन आहेत. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलवर्स देखील आहेत. काही आठवड्यापासून अशाच एका स्टंटमॅनचा तरुणींना बाईकवर मागे पुढे बसवून स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ मोठया प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

‘पोथोलवारिअर्स’या संस्थेकडून हा व्हिडीओ ट्विटरवर टाकून मुंबई पोलिसांना टॅग करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन बीकेसी पोलीस ठाण्यात बाईकर्ससह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान बीकेसी पोलिसांनी या बाईकर्सचा शोध घेतला असता हा बाईकर्स वडाळा टिटी येथील संगम नगर परिसरात राहणारा फैय्याज अहमद आजीमुल्ला कादरी हा असल्याची माहिती समोर आली. तसेच फैयाज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वडाळा टिटी, अंटोप हिल पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, मारामारी, धमकी इत्यादी गंभीर गुन्ह्याची नोंद असून मागील एक वर्षांपासून त्याला तडीपार करण्यात आले होते.फैयाज याचा शोध घेतला असता तो साकिनाका परिसरात येणार असल्याची माहिती बीकेसी पोलिसांना मिळाली आणि शनिवारी त्याला सापळा लावून अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.