मुंबईतील मुद्रांक विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारल्यामुळे नागरिकांना मुद्रांक मिळण्यात अडचणी येत आहेत. मुद्रांक घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा नवीन आदेश मुंबईतील अपर मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने काढला आहे. त्याला विरोध करण्यासाठी विक्रेत्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही यासंदर्भात शासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत बोलताना मुद्रांक विक्रेते संघ मुंबईचे अध्यक्ष अशोक कदम म्हणाले की, १९८२ साली मुद्रांक वितरण परवाना देण्यात आल्यापासून जी पद्धत कार्यालयात निर्देशानुसार चालू होती, तीच पद्धत आजही कायम आहे. खंड ८ मध्ये देण्यात आलेल्या नियमानुसारच मुद्रांक विक्रेते प्रतिनिधीची सही किंवा अंगठा घेतात. परंतु अधिकारी वर्गानी जाणीवपूर्वक असे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे मुंबईतील परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांसह मुद्रांक घेण्यासाठी येणारे नागरिकही अडचणीत आहेत. या नवीन आदेशामुळे सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्यासह मंत्री महोदय किंवा अन्य बड्या व्यक्तीलाही प्रत्यक्ष जाऊन मुद्रांक घ्यावे लागेल.
(हेही वाचा ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता! – रमेश शिंदे)
शासन आदेशात विसंगती
राज्य सरकारने एका प्रकरणात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात स्पष्टपणे सांगितले होते की, मुद्रांक खरेदी करणारी व्यक्ती किंवा संस्था आपले मुद्रांक दुसऱ्यामार्फत खरेदी करू शकतात. मात्र, आताच्या कार्यालयीन आदेशात विसंगती आहे. या कार्यालयीन आदेशात ज्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत, त्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांच्या कामाशी विसंगत असून, हे कार्यालयीन आदेश चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेले आहे, असे अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community