उद्योगमंत्री, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत मुंबईहून अलिबाग येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या स्पीड बोटीला मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली. बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. बोटीतील सर्वजण सुखरूप असल्याचे समजते.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनासंदर्भातील बैठकीसाठी सामंत गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा येथे स्पीड बोटीने निघाले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे त्यांच्या समवेत होते. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबाना जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. नंतर मात्र बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर पालकमंत्री सामंत हे मांडवा येथे सुखरूप उतरून रस्ते मार्गाने अलिबागकडे रवाना झाले. मात्र पालकमंत्र्यांच्या स्पीड बोटला झालेल्या या अपघातामुळे, स्पीड बोटमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे.
(हेही वाचा ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता! – रमेश शिंदे)
Join Our WhatsApp Community