पुण्याची पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम; भाजपाकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू

85

भाजपाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अद्याप निवडणूक आयोगाकडून त्याची घोषणा झाली नसली, तरी काँग्रेसने आपला उमेदवार मैदानात उतरवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपाही सावध झाली असून, तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू केला आहे.

गिरीश बापट यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकिट देऊन सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात भाजपा असली, तरी कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे पुण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीतही उमेदवार देण्यावर ते ठाम आहेत. आघाडीच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत आघाडीधर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादी किंवा उद्धवसेना तेथे दावा करणार नाहीत. सध्या काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी यांचे नाव आघाडीवर आहे.

बापट यांचे पुत्र गौरव हे राजकारणात सक्रिय नाहीत. त्यांच्या स्नुषा स्वरदा बापट सक्रिय असल्या, तरी त्या राजकारणात नवख्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने अनुभवी उमेदवार दिल्यास फटका बसू शकतो. ही बाब लक्षात घेऊन भाजपाने सावध पवित्रा घेतला असून, तुल्यबळ उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि माधुरी मिसाळ ही नावे चर्चेत असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष

कसब्यात रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, बापट यांचा सर्वपक्षीय संपर्क पाहता ही निवडणूक लढवायची की नाही, याबाबत महाविकास आघाडीतील अन्य घटकपक्ष काय निर्णय घेणार, यावर पोटनिवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. बापट कुटुंबियांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे, मग वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय? – अजित पवार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.