भायखळा येथील वीरमाता जिजाबाई उद्यानातील डॉ. भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. परंतु या वस्तू संग्रहालयाच्या जागेचा ताबा जमनालाल बजाज आणि इंटॅक यांच्याकडे असून या वस्तू संग्रहालयाच्या महापालिकेला कोणताही हस्तक्षेप करता येत नसतानाही याच्या दुरुस्तीवर महापालिकेच्यावतीने तब्बल पावणे तीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भायखळ्यातील राणीबागेत असलेल्या भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालय अर्थात म्युझियमची जागा भाडेकरारावर देण्यात आला. परंतु या करारातील अटींचा भंग करत ही जागेवर पार्टीचे आयोजन, शुटींग तसेच इतर कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने मनसेचे तत्कालिन गटनेते संदीप देशपांडे आणि तत्कालिन मनसे नगरसेविका समिता नाईक यांनी याचा करार रद्द करण्याची मागणी केली होती. महापालिका, मेसर्स इंटॅक आणि जमनालाल बजाज फाऊंडेशन यांच्याबरोबरच १५ वर्षांकरता केलेला हा ठराव जानेवारी २०१८ ला संपुष्टात आला. तरीही या म्युझियमची वास्तू जमनालाल बजाज फाऊंडेशन आणि इंटॅकच्या ताब्यातच असल्याने हे संग्रहालय महापालिकेने ताब्यात घेण्याचा ठराव महापालिकेच्या सभागृहात करण्यात आला होता. परंतु आजतागायत हे संग्रहालय महापालिकेच्या ताब्यात आलेली नसून मेसर्स इंटॅक आणि बजाज फाऊंडेशन यांच्याच ताब्यात आहे. या वस्तू संग्रहालयाची इमारत पुरातन वास्तूमध्ये मोडत असून मालाड दगडी बांधकाम असलेल्या या संग्रहालयाचा जिर्णोध्दार सन २००३-०४ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर मागील २० वर्षांमध्ये संग्रहालयाची दुरुस्ती न केल्याने महापालिकेच्यावतीने याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये देवांग कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली असून याकरता सुमारे पावणे तीन कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
(हेही वाचा महापालिकेच्या शाळेत शहरी शेती; कॅनडाच्या दूतावसाने घेतली दखल)
डॉ. भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयात अनेक देशी व विदेशी पर्यटक या वस्तू संग्रहालय ऐतिहासिक सुंदरता व संग्रहालयामधील भारताच्या इतिहासाचे व मुंबई शहराचे दर्शन घडवणाऱ्या अनेक वस्तू व शिल्प यांचा अनुभव करण्यासाठी येतात. या ऐतिहासिक इमारतीचे कालानुसारुप काही होणारी पडझड व गळतीबाबत संग्रहालयाच्या विश्वस्त मंडळाकडून या विभागाला वेळोवेळी कळवले. त्यानुसार इमारतीच्या बांधकामाबाबत स्ट्रक्चरल ऑडीटरची म्हणून विकास दिलावरी यांची नेमणूक करण्यात आली आहे आणि त्यानुसार त्यांनी सूचवलेल्या बांधकामानुसार निविदा मागवण्यात आली.
कोणती केली जाणार कामे?
- मंगळूर कौलांची सर्वकष दुरुस्ती
- आरसीसी स्लॅबची गळती प्रतिबंधक दुरुस्ती
- छप्पर व इतर ठिकाणी नक्षीदार रंगकामाचे जीर्णोध्दार
- इमारतीच्य बाह्य भागाची दुरुस्ती करणे
- आतून व बाहेरुन चुन्याचा गिलावा व रंगकाम
- इमारतीची वाळवी प्रतिबंधक कामे
- इमारतीच्या बाहेरील अनेक शिल्पांना व्यवस्थित करणे