मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उपनगरीय (लोकल) रेल्वेचा प्रवास गतीमान करण्यासह प्रवाशांच्या वेळेची बचत करण्यासाठी ३३ हजार ६९० कोटींच्या प्रकल्पांना सोमवारी मान्यता देण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या निधीतून ही रेल्वे विकास कामे होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) प्रकल्पांबाबतची बैठक सोमवारी सह्याद्री राज्य अतिथीगृहावर घेतली. यावेळी ‘एमआरव्हीसी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई अर्बन वाहतूक प्रकल्पांचे सादरीकरण केले. मुंबई महानगर प्रदेश उत्तर आणि पूर्व दिशेला खास करून नवी मुंबईतील नव्या विमानतळाच्या दिशेला ज्या वेगाने विकसित होत आहे ते पाहता उपनगरीय वाहतूक व्यवस्थेचे अत्याधुनिकीकरण आणि विस्तार आवश्यक झाला आहे. या दृष्टीने ३३ हजार ६९० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना यावेळी मान्यता देण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेशातील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेचे नवे मार्ग, प्रलंबित मार्गांची कामे, नवी स्थानके, जुन्या स्थानकांचा विकास, भूसंपादन, पुनर्वसन या कामांसाठी निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा. आवश्यक निधी उभारण्यासाठीचे पर्याय सादर करा. प्रस्तावित रेल्वे विकास कामे निर्धारीत कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी जबाबदारी निश्चित करा, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्याचे मुख्य सचिव, तसेच अर्थ व नियोजन, वन विभागांचे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आदी बैठकीला उपस्थित होते.
‘या’ कामांना मान्यता
१) बोरिवली-विरार दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका – 26 RKM
२) कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका – 15 RKM
३) गोरेगाव-बोरिवली दरम्यानच्या हार्बर मार्गिकेचा विस्तार – 7 RKM
४) कल्याण-आसनगाव दरम्यान चौथी मार्गिका – 32 RKM
५) हार्बर लाईनवरील सीएसएमटी-पनवेल आणि ट्रान्स हार्बर लाईनवर सीबीटीसी, मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कल्याण मार्गावर सीबीटीसी, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार मार्गावर सीबीटीसी
६) १९ रेल्वे स्थानकांची सुधारणा
(हेही वाचा – महापालिकेच्या शाळेत शहरी शेती; कॅनडाच्या दूतावसाने घेतली दखल)
Join Our WhatsApp Community