बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार ठाकरे गटाच्या युवासेनेने दाखल केली आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचेही युवासेनेने या पत्रात नमूद केले आहे.
( हेही वाचा : नागपूर-अमरावती महामार्गावर शिवशाही बसला आग!)
एफआयआर नोंदवण्याची मागणी
ठाकरे गटाच्या युवासेनेचे नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कनाल यांनी या तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणीही या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.
वादग्रस्त वक्तव्य
बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री यांच्या कथेचे आयोजन २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यान मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये करण्यात आले होते. या चर्चेदरम्यान त्यांनी साईबाबांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. साईबाबांविषयी बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी “साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे.” असे मोठे वक्तव्य केले होते. यामुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या असून धीरेंद्र शास्त्रींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community