अभिनेता रोहन मंकणीसह दहा जणांना पुणे सायबर सेलकडून अटक! काय आहे प्रकरण?

सायबर पोलिसांनी सोमवारी महर्षीनगर येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल जवळील नयनतारा हाइट्स येथे सापळा रचला व आरोपींना अटक केली.

193

पुणे शहर पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने एका हाय प्रोफाइल टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून बॅंक खातेदारांची गोपनीय माहिती चोरुन ती विक्री करण्याचा प्रयत्न केला जात होता. या टोळीत अभिनेते रविंद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी याचाही समावेश असून, त्यालाही सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

२५ लाख घेताना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने देशभरातील अनेक बॅंक खातेदारांची गोपनीय माहिती चोरी करुन ती विकण्याचा बोत आखला होता. माहिती चोरी करण्यात आलेल्या या खात्यांमध्ये (पाच बँकांसह) एकूण २१६ कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. खातेदारांची गोपनीय माहिती चोरुन त्याची विक्री करण्यात येत असताना, पोलिसांकडून कारवाई करत या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. त्यामुळे खातेदारांचे हे २१६ कोटी रुपये वाचले आहेत. माहिती विक्री करुन २५ लाख रुपये घेत असताना दहा जणांना पुणे सायबर सेलकडून अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता सायबर पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. रोहन मंकणी हे भाजपच्या चित्रपट आघाडीचे शहराध्यक्ष आहेत तसेच ते अभिनय क्षेत्रातही कार्यरत आहेत.

(हेही वाचाः ‘त्या’ इनोव्हा मोटारीतील दोघांची ओळख पटली, अटकेची शक्यता! )

आणखीही काही जणांचा समावेश

पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगरमधील पुणे सायबर पोलिस ठाण्यात १२ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखीही काही जणांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबाद येथील एका वृत्तवाहिनीचा मालक आघाडीच्या दोन बॅंकांच्या कर्मचा-यांसोबत मिळून हे कृत्य करत असल्याची माहिती मिळत आहे.

सापळा रचून अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीकडून चालू तसेच वापरात नसलेल्या निष्क्रिय खात्यांची माहिती चोरी करुन ती विकण्याचा डाव रचण्यात आला होता. पीएसआय गोरे यांना मिळालेल्या सूचनेवरुन पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी महर्षीनगर येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल जवळील नयनतारा हाइट्स येथे सापळा रचला व आरोपींना अटक केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.