नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी रिकामी करण्यात आली आहे. तेथील रहिवाशांना भोईवाडा येथील म्हाडा संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र या संक्रमण शिबिरात राहत असलेल्या रहिवाशांना आता पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. जुलै २०२२ मध्ये बीडीडी चाळीतील कुटुंबे हळूहळू या संक्रमण शिबिरात स्थलांतरित होऊ लागली. सुरुवातीला इथे २४ तास पाणी येत होते, पण जस जशी स्थलांतरित होणारी कुटुंबे वाढली असे येथे येणाऱ्या पाण्याचा कालावधी २४ तासांवरून दोन तास आणि आता १५ मिनिटेही पिण्याचे पाणी येत नाही.
समस्या कशी निर्माण झाली?
दादरमधल्या भोईवाडा परिसरात असलेल्या म्हाडा संक्रमण शिबिरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उद्भवली आहे. या संक्रमण शिबिरातील 5 C बिल्डिंगमध्ये नायगांव बीडीडी चाळ क्र. १७ ते २२ मधील बीडीडीवासीय इथे राहतात. डिसेंबर २०२२ पासून प्रामुख्याने पाण्याची समस्या सुरू झाली. सुरुवातीला कमी कुटुंबे होती, त्यामुळे पाण्याचा वापर फारसा नव्हता, म्हणून पाणी २४ तास होते. कुटुंबे वाढल्यानंतर मात्र म्हाडा व महापालिकेने नियोजन करून पाण्याचा पुरवठा वाढवणे आवश्यक होते, पण तसे नियोजन केले नाही, त्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
रहिवाशांच्या तीव्र प्रतिक्रिया
या समस्येला कंटाळून रहिवाशांनी २ एप्रिल रोजी उद्गिवन होऊन बीडीडी चाळीच्या बांधकामाच्या ठिकाणी मोर्चा काढून बीडीडी पुनर्विकासाचे काम थांबवले. तसेच स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. आम्हाला २४ तास नको, पण निदान एक तास तरी नीट पाणी येऊदे, आता तर दहा मिनिटेही पाणी नीट येत नाही, आम्ही काय करायचे? भर पावसात पोलीस संरक्षण घेऊन आम्हाला बीडीडीमधून बाहेर काढलं आणि इथे आल्यावर पिण्याचे पाणीच आम्हाला मिळत नाही, अशी प्रतिक्रिया रहिवाशी देत आहेत.
असे महापालिकेचे चुकले पाण्याचे नियोजन
- म्हाडा, शिर्के बिल्डर, महापालिका यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येतो, याचे कारण म्हणजे म्हाडाने किती रहिवाशी आहेत हे गृहित धरून पाणी सोडायला सांगितले. बीडीडी चाळीत किंवा आता संक्रमण शिबिरात लोक आल्यावर घरोघरी किती लोक राहतात आणि त्यांची पाण्याची गरज किती आहे याचा सर्वे न करता अंदाजे पाणी सोडत आहे.
- तसेच 5C बिल्डिंगच्या खाली असणाऱ्या टाकीमध्ये येणारे BMC चे पाणी हे बिल्डिंगच्या वर (गच्चीत) असणाऱ्या फक्त दोनच टाक्यात जाते वास्तविक तेथे एकूण सहा टाक्या आहेत. या दोन टाक्यांचे पाणी बाकीच्या चार टाक्यांमध्ये जायला साधारण १ ते २ तासांचा वेळ लागतो, म्हणजे खालून पाणी वर चढायला २ तास आणि वरच्या दोन टाक्यांमधून बाकीच्या चार टाक्यांमध्ये पाणी जायला व समान पातळी व्हायला २ तास, असे चार तास रोज वाया जातात. आणि जर फक्त या दोन टाक्या भरल्यावर पाणी सोडले तर अर्ध्या घरांना पाणी येते तर बाकीच्यांना येत नाही.
या समस्येसंबंधी गेल्या तीन महिन्यांत रहिवाशांनी म्हाडा अधिकारी, स्थानिक आमदार यांच्याबरोबर चार बैठका घेतल्या. त्यांना प्रत्येक वेळी आश्वासन दिली गेली, उपाययोजना सांगितल्या गेल्या, पण त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही. कायमस्वरूपी उपाय अजूनही करण्यात आलेला नाही. याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.
Join Our WhatsApp Community