वाझेंसाठी बैठका घेणारे मुख्यमंत्री, जनतेच्या प्रश्नांसाठी बैठका कधी घेणार?- संजय कुटे

कोरोनाच्या नावाखाली सर्व प्रश्नांपासून पळ काढणारे हे सरकार प्रत्यक्षात कोरोना परिस्थितीही आटोक्यात ठेवण्यात अपयशी ठरलेले आहे, अशी टीका कुटे यांनी केली.

149

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यासाठी रात्रंदिवस बैठका घेणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेच्या प्रश्नांसाठी सुद्धा बैठकांचा धडाका कधी लावणार, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे यांनी बुधवारी उपस्थित केला. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले कुटे

दुपारनंतर शासकीय कामकाजाला सुरुवात करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गेल्या तीन दिवसांपासून बैठकांमागून बैठका घेत आहेत, ही एक आश्चर्यजनक बाब आहे. वाझे यांच्यासाठी एवढ्या तत्परतेने ज्या बैठका घेतल्या जात आहेत, तशा बैठका सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी घेतल्या जाणार, असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यावर पीक विमा योजनेचे निकष बदलल्यामुळे राज्यातील शेतकरी, पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. नैसर्गिक संकटामुळे सोयाबिन, उडीद, कापूस उत्पादक शेतकरी जेरीस आलेला आहे. त्यात सक्तीच्या वीज बिल वसुलीचे सुलतानी संकटही शेतकऱ्यांवर कोसळले आहे. विधानसभेत वीज बिल वसुलीस स्थगिती दिल्याचे आश्वासन दिल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही स्थगिती उठवण्यात आली. महाविकास आघाडी सरकार किती दुटप्पी आहे हे यातूनच स्पष्ट होते. कोरोनाच्या नावाखाली सर्व प्रश्नांपासून पळ काढणारे हे सरकार प्रत्यक्षात कोरोना परिस्थितीही आटोक्यात ठेवण्यात अपयशी ठरलेले आहे, अशी टीका कुटे यांनी केली.

(हेही वाचाः मुंबई पोलिस आयुक्त बदलण्यावरुन ठाकरे सरकारमध्ये दोन गट?)

मुख्यमंत्र्यांच्या मॅरेथॉन बैठका

राज्यात सध्या चर्चेत असलेल्या पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची सकाळी १० वाजता बैठक बोलावली. बैठकीत पोलिस दलातील खांदेपालटाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलिस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचीही वाझे प्रकरणावर मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद दाराआड चर्चा झाली होती.  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.