मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते अयोध्येतील राम जन्मभूमीचे दर्शन घेणार असून यानिमित्ताने शिवसेनेकडून एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्र, हिंदुत्व, रामराज्य, जनतेची सेवा असे मुद्दे या टिझरच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर हा टीझर प्रचंड व्हायरल होत आहे.
रामराज्य, हिंदुत्व आणि भगवा, अयोध्या दौऱ्याचा टीझर
“अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ” अशी या टीझरची टॅगलाइन आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या पहायला मिळत आहे. “रामराज्य अर्थात एक राज्य ते सुशासित असेल, या राज्यासाठी शासक नाहीतर जनतेचा सेवक काम करेल, राज्यातील जनता परिवाराप्रमाणे राहिल आणि मानवसेवा सर्वोच्च असेल, अन्यायाविरोधात आपण कायम आवाज उठवू, जेथील भगवा कधीच खाली येणार नाही. ज्यांच्या कणा-कणात राम आहे” अशाप्रकारच्या ओळी वापरून हा टिझर हिंदी भाषेत प्रसिद्ध करण्यात आला आहेत आणि टीझरच्या शेवटी एकनाथ शिंदेच्या फोटोसह “अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ” ही टॅगलाइन देण्यात आली आहे. एकूणच रामराज्य, हिंदुत्व आणि भगवा यावर प्रभाव टाकत हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडिओ बघून मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याला किती महत्त्व आहे हे अधोरेखित करण्यात आले आहे.
“अयोध्या हा आमच्यासाठी भावनेचा, श्रद्धेचा विषय” – मुख्यमंत्री
९ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह दौऱ्यावर जाणार आहेत. अयोध्या हा आमच्यासाठी भावनेचा, श्रद्धेचा विषय आहे. राजकारण म्हणून या विषयाकडे पाहणार नाही असे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community