या व्यक्तीने एकट्यानेच निर्माण केला २० फूट खोल तलाव; आता गावात पाण्याची कमतरता नाही

139

दशरथ मांझी हे नाव आज सर्वांनाच माहिती आहे. नवाझुद्दिन सिद्दिकी यांनी मांझी या चित्रपटात त्यांची भूमिका साकारली होती. आता झारखंडच्या पश्चिम सिंहभूममध्ये कुमरिता गावात राहणार्‍या चुम्बरु तामसोय यांनी एकट्याच्या बळावर भव्य तलाव निर्माण केला आहे.

( हेही वाचा : “अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ”! मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी शिवसेनेचा टीझर, हिंदुत्व,भगवा अन् रामराज्याची झलक )

१०० x १०० फूट आणि २० फूट खोल तलाव निर्माण करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. चुम्बरु यांचं विशेष कौतुक यासाठी की त्यांनी आपलं जीवन हा तलाव खोदण्यासाठी अर्पण केले. चुम्बरु पर्यावरण प्रेमी आहेत. पाण्याची बचत आणि हिरवळ यासाठी त्यांनी हे महान कार्य केले आहे.

हे कार्य करताना त्यांनी इतरांकडून आणि सरकारकडूनही मदतीची अपेक्षा केली नाही. १९७५ मध्ये ज्यावेळी चुम्बरु ४५ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या विभागात पाणी नव्हतं, खायचे देखील वांदे झाले होते. तेव्हा एक कंत्राटदार गावातल्या तरुणांना मजूरी करण्यासाठी रायबरेलीमध्ये घेऊन गेला. यामध्ये चुम्बरु देखील होते.

इथे काम करताना त्यांना असं वाटू लागलं की घरापासून इतकं लांब राहून मातीच खोदायची असेल तर आपल्या गावात हे काम केलं तर? मग काही महिन्यांनी ते पुन्हा आपल्या गावी आले. त्यांनी आपल्या जमिनीत बागकाम सुरु केले. त्यासाठी पाण्याची आवश्यकता होती. त्यांनी जवळच्या तलावाच्या मालकाकडे पाण्याची मागणी केली पण त्याने पाणी देण्यास नकार दिला.

या घटनेमुळे त्यांना त्यांच्या आयुष्याचे ध्येय प्राप्त झाले. आता त्यांनी स्वतःच तलाव खोदायला सुरुवात केली. गावातल्या लोकांनी त्यांना मुर्खात काढलं. इतकंच काय तर त्यांच्या धर्मपत्नीने देखील त्यांना वेड्यात काढलं आणि तिने दुसर्‍यासोबत लग्न केलं. चुम्बरु दुखावले, मात्र त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही. काही वर्षांत तलावाचं काम पूर्ण झालं. तलावाच्या पाण्यामुळे बाग आणि शेतीसाठी पाणी मिळू लागलं.

चुम्बरु पाच एकर जमिनीवर शेती करतात. तसेच मत्स्यपालन देखील करतात. सुमारे ६० वृक्षांची फळबागही त्यांनी निर्माण केली आहे. या तलावातील पाण्याचा वापर गावातील इतर शेतकरी देखील करतात. आजही चुम्बरु तलावाचा विस्तार करण्यासाठी खोदकाम करत असतात, कारण त्यांची इच्छा आहे की गावात कधीही पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये. २०१७ मध्ये रांचीच्या मत्स्य विभागाने एका कार्यक्रमात त्यांना आमंत्रित करुन त्यांचा सत्कार केला. अजूनही म्हणावी तशी त्यांनी दखल कुणी घेतलेली नाही. चुम्बरु यासारखे लोक आपल्या समाजातील खरे नायक आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.