केरळात ट्रेनमध्ये जाळपोळ करणारा महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात अटक

125

केरळ राज्यातील कोझिकोट येथे अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसच्या डब्यात जाळपोळ करून धावत्या गाडीतून पळून गेलेल्या शाहरुख सैफी याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएस आणि रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केली असून शाहरुख याला केरळ एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार शाहरुख सैफी हा केरळात केलेल्या दहशतवादी कृत्यात स्वतःही जखमी झाला होता. त्याने स्वत: सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि तो अजमेरला जाण्यास निघाला होता, तत्पूर्वी त्याला महाराष्ट्र एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पकडले. रविवारी घडलेल्या घटनेनंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी कन्नूर रेल्वे स्थानकावर थांबलेल्या अलप्पुझा-कन्नूर एक्सप्रेस ट्रेनच्या डब्यांची तपासणी केली आहे.

(हेही वाचा ठाणे पोलिसांकडून ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी, पण ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन)

प्रवाशावर पेट्रोल ओतून आग लावलेली

रविवारी रात्री ट्रेन एलाथूरजवळील कोरापुझा पुलावर आली असता एका अज्ञात व्यक्तीने प्रवाशांवर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात नऊ जण भाजले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयिताने कोझिकोड जिल्ह्यातील एलाथूरजवळ अलप्पुझा-कन्नूर मुख्य कार्यकारी एक्स्प्रेस ट्रेनच्या डी -१ डब्यात एका प्रवाशावर पेट्रोल ओतले आणि आग लावली. या जाळपोळीत भाजलेल्या तीन प्रवाशाना जवळच्या खासगी रुग्णालयात तर पाच जणांना कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, जखमींमध्ये तीन महिला आहेत.

रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत होता 

केरळ पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र तयार केले होते. या प्रकरणातील महत्त्वपूर्ण साक्षीदाराच्या मदतीने कोझिकोडमधील एलाथूर पोलिस ठाण्यात रेखाचित्र तयार करण्यात आले होते. रेखाचित्रातील इसमाच्या शोध सुरू असताना या घटनेतील जखमी हा रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात स्वतः हुन दाखल झाला होता व उपचार घेऊन तो अजमेरला पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने स्थानिक पोलिसांची मदत घेऊन मंगळवारी त्याला रत्नगिरी रेल्वे स्थानकातून अटक केली. शाहरुख सैफी (२७) असे अटक करण्यात आलेल्या संशयित इसमाचे नाव आहे.शाहरुख हा नवीदिल्ली शाहीन बाग येथे राहणारा आहे, त्याच्याजवळून पोलिसानी मोबाईल फोन, आधारकार्ड, पॅन कार्ड इत्यादी साहित्य जप्त केले असून त्याचा ताबा केरळ एटीएसकडे देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.