सोडून गेलेल्या प्रेयसीला परत आणण्यासाठी एका कथित मौलानाने परळ येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय जिम ट्रेनरकडे चक्क ‘डेडबॉडी’ची मागणी करून त्याची लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात या कथित मौलाना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या मौलानाचा शोध घेण्यासाठी सायबर विभागाची मदत घेण्यात येत आहे, हा कथित मौलाना इंस्टाग्राम वर भविष्यशास्त्र नावाचे पेज चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिणा गुगल पे केली आणि…
आर्थिक फसवणूक झालेला जिम ट्रेनर हा परळ भागात राहणारा आहे, जॉब लागत नाही त्यामुळे लग्न होत नसल्यामुळे हा जिम ट्रेनर काहीसा निराश होता. डिसेंबर २०२२ मध्ये इंस्टाग्राम या सोशल मीडियावर जिम ट्रेनरला भविष्यशास्त्र हे पेज आढळून आले, या पेजवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करून स्वतःचे भविष्य जाणून घेण्यासाठी त्याने त्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला, हा कॉल एका व्यक्तीने उचलल्यानंतर जिम ट्रेनर याने “मला माझ्या भविष्याबाबत जाणून घ्यायचे आहे, तसेच मला जॉब मिळत नसल्यामुळे माझे लग्न होत नाही,” असे त्याने कॉल करून सांगितले. समोरच्या व्यक्तीने तुझा प्रॉब्लेम ३ दिवसात सोडवतो असे सांगून जिम ट्रेनरची माहिती व त्याच्या प्रेयसीचा मोबाईल क्रमांक घेतला व १०१ रुपये गुगल पे करण्यास सांगितले. समोरच्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे जिम ट्रेनर याने स्वतःची सर्व माहिती आणि प्रेयसीचा मोबाईल क्रमांक पाठवून १०१ रुपये दक्षिणा म्हणून गुगल पे केली. तब्बल पाच दिवसांनी जिम ट्रेनरला त्याच क्रमांकावरून कॉल आला व कॉल करणाऱ्याने तुझी समस्या खूप मोठी असून त्यांच्याकडे दुबई येथून एक मोठे मौलाना आले आहेत, असे सांगून त्यांच्याशी बोलण्यास सांगितले, कथित मौलाना याने जिम ट्रेनरच्या भूतकाळाबाबत काही माहिती दिली व तुझे एका मुलीवर प्रेम होते असे सांगताच जिम ट्रेनरचा कथित मौलानावर विश्वास बसला, मौलानाने त्याला तुला तुझ्या प्रेयसीचा फोन येईल परंतु तू उचलू नको, तुझ्या सर्व समस्या सोडवून देतो असे सांगून त्याच्याकडे पैशाची मागणी केली.
(हेही वाचा फडणवीसांवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी आहे का; नारायण राणेंचा घणाघात )
भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली
काही दिवसांनी पुन्हा या कथित मौलानाचा त्याला कॉल तुझी समस्या खूप मोठी आहे, तुझ्या प्रेयसीवर बंदिश टाकली आहे, हि बंदिश काढण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी केली, ट्रेनरने ती देखील पूर्ण केली, त्यानंतर पुन्हा मौलानांने कॉल करून प्रेयसीवरील बंदिश काढण्यासाठी एक डेडबॉडीची (मृत पुरुषाचे शरीर) गरज आहे, मात्र जिम ट्रेनरने त्यासाठी नकार देताच तुझ्या प्रेयसीचा मृत्यू होईल असे सांगून त्याला घाबरवले पर्याय म्हणून एकाच बळी घ्यावा लागेल त्यासाठी एका लाख रुपये पाठव असे मौलानाने सांगतिले. मात्र जिम ट्रेनरने हे सर्व इथेच थांबवा मला काहीही करायचे नाही असे सांगितले. फेब्रवारी महिन्यात पुन्हा मौलानाचा कॉल आला व त्याने ८ बकऱ्यांची बळी द्यायची आहे, त्यासाठी ५० हजार रुपयाची मागणी केली, जिम ट्रेनरने त्याला प्रत्यत्तर न देता कॉल बंद केला, काही दिवसांनी पुन्हा कथित मौलानाने कॉल करून ५० हजार रुपयाचे काय झाले अशी विचारणा केली असता आपली फसवणूक होता असल्याचे जिम ट्रेनरच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत त्याने थोडे थोडे करून २ लाख रुपये कथित मौलानाला पाठवले होते. आपली अजून फसवणूक होऊ नये व यातून बाहेर पडण्यासाठी अखेर त्याने बुधवारी भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी कथित मौलाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण नुकतेच पोलीस ठाण्यात दाखल झाले असून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community