प्रचंड बुद्धिमत्तेचा क्रांतिकारक म्हणजे वीर सावरकर – आशिष शेलार

97

वीर सावरकरांच्या कार्यकर्तुत्त्वाचं वर्णन आपण सगळ्यांनी वाचलं आहे, चित्रपटातून पाहिलं आहे. पण, जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना, तरुंगातील भिंतीवर दगडांनी महाकाव्य लिहायचं, ते पुसलं गेल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा तंतोतंत लिहून काढायचं, ही सहजशक्य बाब नाही. प्रचंड बुद्धिमत्तेचा क्रांतिकारक असलेल्या वीर सावरकरांनी ते शक्य करून दाखवले. वीर सावरकर हे देशभक्त नागरिकांना प्रेरणा देणारं विद्यापीठ आहे, असे उद्गार भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काढले.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला मिळत असलेल्या प्रचंड यशाच्या पार्श्वभूमीवर आणि यात्रेचाच उद्देश पुढे नेत ‘मी सावरकर’ या स्वातंत्र्यवीरांवर आधारित सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, ५ एप्रिल २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात करण्यात आले. या कार्यक्रमात शेलार बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर, नात असिलता राजे, संगीतकार श्रीधर फडके, निरुपणकार डॉ. संजय उपाध्ये आणि अभिनेता शरद पोंक्षे उपस्थित होते.

सावरकर म्हणजे क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान

शेलार पुढे म्हणाले, सावरकर म्हणजे काय-काय, असा विचार मनात डोकावतो. वीर सावरकर म्हणजे गुणवान विद्यार्थी, सावरकर म्हणजे विदेशात बॅरिस्टरची पदवी घेणारा उच्च विद्याविभूषित व्यक्ती, वीर सावरकर म्हणजे अभिनव सारखी संघटना मांडणारे, सावरकर म्हणजे सशस्त्र क्रांतिची संघटना गुप्तपणे बांधणारा सीबीआय आधीचा माणूस, सावरकर म्हणजे क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान, सावरकर म्हणजे कवी-लेखक, शिक्षक, वाचनालय निर्माते, महाकाव्य निर्माते… आणखी बरेच काही.

(हेही वाचा ईडी, सीबीआयच्या विरोधात याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांना सुनावले)

आजकाल एखाद्या पुस्तकाच्या २०-२५ हजार प्रती खपल्या तरी त्याला पुरस्कार देतात. पण, सावरकरांच्या १८५७ च्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचा खप लाखाच्या वर होता, असे ते लेखक होते. मतमतांतरे असू शकतात, विचार विरोध असू शकतात, विचारद्वेष असू शकतो, पण सत्य-असत्यामध्ये सत्याच्या बाजुला राहणाऱ्यांना असत्याने मारणे, हे शक्य नाही. सावरकरांचे विचार तेच आहेत. राजकीय स्वार्थापोटी जी भिरभिर सुरू आहे, ती इतकी भयंकर आहे, की आपण कुठल्या थरापर्यंत गेलो याची कल्पनाही करवत नाही. निषेध हा शब्द त्यापुढे फिका आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

वीर सावरकर ही आमची ताकद!

  • त्याकाळी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पहिल्यांदा आपली बाजू मांडणारा वकील, म्हणजे वीर सावरकर. हेगच्या न्यायालयामध्ये वीर सावरकरांनी राष्ट्राची आणि क्रांतिकारकांची बाजू मांडली होती. तो काळ फक्त आठवून पहा, असे अव्हान शेलार यांनी विरोधकांना दिले. सावरकर म्हणजे आत्मचरित्र निर्माण केल्यानंतर त्यांच्या आत्मचरित्र्याला प्रसिद्धी मिळण्याआधीच बंदी घातली गेली, असं जाज्ज्वल्य व्यक्तीमत्त्व.
  • सावरकरांचा द्वेष राहुल गांधी आज करताहेत असे नाही. त्यावेळच्या काँग्रेसपासून याची रि ओढली जात आहे. सावरकरांचा द्वेष इथपर्यंत झाला की, पाकिस्तानचे पंतप्रधान जीना ज्यावेळी पहिल्यांदा भारतात येणार होते, त्यावेळी सावरकरांना स्थानबद्ध करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर देशात जेव्हा पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, त्यावेळी तत्कालीन काँग्रेसने सावरकरांना अट घातली, तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात भाग घेता कामा नये, असं लिहून द्या.
  • पण, सावरकर आमचं प्रेरणास्थान आहेत. देशभक्त नागरिकांना प्रेरणा देणारं सावरकर हे एक विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाचा अवमान वारंवार होत आहे. तो आम्ही कदापी सहन करणार नाही. सावरकर ही आमची ताकद आहे. त्यामुळे ती वाढवत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपली आहे, असेही शेलार म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.