वाहन चोरी ते ड्रग्जच्या धंद्यापर्यंत मजल मारणारा सराईत गुन्हेगार रहीमला अटक

110

वाहन चोरी ते ड्रग्जच्या धंद्यापर्यंत मजल मारणाऱ्या रहीम रईस खानला अखेर कुर्ला येथून अमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने रहीम याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे बनावट चाव्यांचा बुंजका, बनावट चाव्या तयार करणारी साधने, चोरीची मोटार, चार नंबर प्लेटस आणि मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे. वाहने चोरी करण्याची कला जोपासात रहीम हा चोरीच्या वाहनाचा वापर अमली पदार्थ तस्करीसाठी करीत होता अशी माहिती गुन्हे शाखा कक्ष ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांनी दिली.

रहीम रईस खान (३८) हा कुर्ला कुरेशी नगर येथील भुरटा चोर म्हणून त्याची ओळख होती. छोट्या मोठ्या चोऱ्या करणाऱ्या रहीम याने बनावट चाव्या बनवून त्या चाव्यानी बंद घराचे कुलपे उघडून चोरी करीत होता, त्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची पद्धत बदलून तो वाहने चोरी करून त्यांची परराज्यात विक्री करू होता. वाहने चोरी करताना तो सोबत चाव्यांचे बुंजके, व बनावट चावी तयार करण्याचे साहित्य सोबतच घेऊन फिरत, रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या मोटारीच्या चाव्या जागेवर बनवून त्या मोटारी चोरी करीत होता. बनावट चाव्या बनविण्याची कला रहीमने त्याच्या कुटुंबापासून जोपासत आला आहे, परंतु या कलेचा वापर तो चोरीसाठी करीत होता.

(हेही वाचा राज्यातील १६ हजार बिल्डरांना महरेराच्या नोटीस; १५ दिवसांचा अल्टिमेटम )

वाहने चोरी करता करता तो जबरी चोरीचे गुन्हे करू लागला होता, एका जबरी चोरीच्या गुन्ह्यात त्याला ७ वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने पुन्हा वाहने चोरी करू लागला, या चोरीच्या धंद्यातून त्याची ओळख काही अमली पदार्थ विक्रेत्या सोबत झाली होती, अमली पदार्थाच्या धंद्यांत बक्कळ पैसा बघून त्याने आपल्या धंद्यांची लाईन बदलून तो अमली पदार्थाच्या धंद्यांत उतरला. चोरीच्या वाहनाचा वापर तो अमली पदार्थाचा पुरवठ्यासाठी करू लागला होता. नवी मुंबई, मुंबईसह आजूबाजूच्या शहरात चोरीच्या वाहनातून अमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या रहीम याच्यावर नवी मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहे व मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात नुकत्याच एका गुन्ह्यात तो फरारी होता.

सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलणारा रहीम हा सध्या कुर्ला पूर्व कुरेशी नगर येथील एका इमारतीत भाडेतत्वावर राहत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ६चे पो.उ.नि संदीप रहाने यांना मिळाली होती, तसेच तो कुर्ला कुरेशी नगर येथे एका ठिकाणी येणार असल्याचे कळताच प्रपोनि. रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. हनुमंत ननावरे, मसपोनि.अर्चना कुदळे,पो.उ.नि रहाणे,मुठे, बेळणेकर आणि पथकाने सापळा रचून त्याला घराजवळून ताब्यात घेण्यात आले, पोलिसानी त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरात ३७ ग्राम चरस, २९ ग्राम एमडी, ७ ग्राम ब्राऊन शुगर, ५० हजार रोख रक्कम, ९ मोबाईल फोन्स, मोटार वाहनांच्या ३९८ चाव्यांचा बुंजका, बनावट चावी बनविण्याचे साहित्य,चार बनावट नंबर प्लेटस, एक इको मोटार असा एकूण १४ लाख ३८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती प्रपोनि. साळुंखे यांनी दिली. यापूर्वी रहीम याच्या ५ सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती, त्यांच्याकडून ४९ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता अशी माहिती साळुंखे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.