चोरे आले, ५० खोके घेऊन बघा किती चोर आले, एकदम ओके होऊन बघा कसे चोर आले, ५० खोके घेऊन बघा किती चोर आले, असे रॅप साँग करणाऱ्या राम मुंगासे या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याला अंबरनाथ पोलिसांकडे सोपविले जाणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करू दिली आहे.
दोन दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी राम मुंगासेचा रॅपचे ट्वीट करून त्याचे कौतुक केले होते. पण शिंदेंच्या शिवसेनेच्या युवासेना कोअर कमिटीच्या सदस्य स्नेहल कांबळे यांनी या रॅप साँगबाबत आक्षेप घेत तक्रार दाखल केली. मुंगासेविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा रॅपर मूळचा छत्रपत्री संभाजीनगरचा आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी रॅपर राम मुंगासेला अटक करून त्याला अंबरनाथ पोलिसांच्या हाती दिले जाणार आहे.
याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून म्हटले की, ‘राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणे म्हटले म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली आणि ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय? त्याने तर कोणाचे नाव देखील घेतले नव्हते. ५० खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलिसांनी स्पष्ट करावे. ५० खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलिसांनी सिद्ध करावे. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.’
(हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंना उच्च न्यायालयाने फटकारत दिलासा देण्यास दिला नकार)
Join Our WhatsApp Community