विद्याविहार उड्डाणपुलाचा खर्च १२ कोटींनी वाढला

110

विद्याविहार रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या खर्चात तब्बल १० ते १२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी विविध करांसह ८८ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार होता, परंतु आता या पुलाच्या बांधकामाचा खर्च तब्बल १०० कोटी रुपयांवर जावून पोहोचला आहे.

विद्याविहार रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाचे बांधकाम मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए) तर्फे करण्यात येणार होता. परंतु कालांतराने हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आला. त्यानुसार महापालिकेने या रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन, सर्वसाधारण आराखडा, संकल्पचित्रे, अंदाजपत्रक, आणि मसुदा निविदा बनविण्याकरिता तेव्हाच्या मेसर्स एस.एन. भौबे अँड असोसिएट प्रा.ली. (आत्ताचे नाव मेसर्स टि.पी.एफ. इंजीनीअरिंग प्रा. लि.) या तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती केली. या सल्लागाराने तयार केलेला विद्याविहार रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाचा सर्वसाधारण आराखडा मध्य रेल्वेने मंजूर केला. त्यानुसार, तांत्रिक सल्लागाराने या कामाची निविदा तयार केली. यासाठी आय.आय.टी. मुंबई यांची फेरतपासणी सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. रेल्वे विभागाच्या गरजेनुसार तसेच निर्देशानुसार मेसर्स राईट्स लि. यांची रेल्वेच्या जागेवरील (हद्दीतील) कामावर देखरेख करण्यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

यासाठी कामासाठी  मार्च २०१८ मध्ये ए. बी. इन्फ्राबिल्ड लिमिटेड यांची निवड करण्यात आली आली आणि यासाठी ८८ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. पावसाळा वगळून १९ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. त्यामुळे सुधारीत कामाच्या आराखड्यानुसार बांधकाचा खर्च१२ कोटींनी वाढला असून हा सुधारीत खर्च १०० कोटी ४५ लाख रुपये एवढा झाला आहे. तर यासाठी नेमलेल्या सल्लागाराला मूळ कंत्राट किंमतीनुसार ९९ लाख ९८ हजार रुपयांचे शुल्क देण्यात येणार होते, यामध्ये ११ लाख ७३ हजार रुपयांची वाढ होऊन हा खर्च १ कोटी ११ लाख ७१ हजारांचा शुल्क दिले जाणार आहे.

(हेही वाचा जॉन्सन अँड जॉन्सनची कॅन्सरला कारणीभूत ठरणारी उत्पादने झाली बंद; अमेरिकेत कंपनी देणार भरपाई; भारतात मात्र मौन)

पुलाच्या मूळ आराखड्यानुसार प्रकल्पाची लांबी ४८० मीटर एवढी होती व रेल्वे हद्दीमध्ये पुलाचे काम स्टीलमध्ये तर रेल्वे हद्दीबाहेर काँक्रिट तुळई अर्थात गर्डर वापरुन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तांत्रिक सल्लागाराने आराखडा तयार केला होता, पंरतु रेल्वे प्रशासनाने आयआयटीने सुचवल्यानुसार ओपन वेब गर्डरद्वारे बांधकाम करण्याचे सुचवल्याने यसाठी ११०० मेट्रीक टन ऐवजी २०६९ मेट्रीक टन स्टीलचा वापर झाला.

या पुलाची लांबी आराखड्यानुसार ४८० मीटर एवढी ग्राह्य धरली होती, परंतु विद्याविहार पश्चिमेकडील रामदेव पीर मार्ग व बस डेपोवर या पुलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने पुलाच्या पश्चिम बाजुला १३३ मीटर लांबी वाढवण्यात आली व पुलाच्या पूर्व व पश्चिम बाजुस लोखंडी तुळई वापरुन करण्याचा सुधारीत आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये ६१३ मीटर लांबीचे बांधकाम सूचवण्यात आले . रेल्वे रुळावरील पुलाचे काम करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त बाबींच्या वापरामुळे हा १३.६१ टक्के पुलाच्या बांधकामचा खर्च वाढल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  • मूळ कंत्राट किंमत :  ८८.४२ कोटी रुपये
  • अतिरिक्त व जादा रक्कम : १२.०३ कोटी रुपये
  • एकूण कंत्राट किंमत : १००.४५ कोटी रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.