सावरकरांच्या हिंदुत्वाची धार : संघ, भाजप, शिंदेंवर हल्ला चढवायला ठाकरे, पवार, राऊतांना सापडले हत्यार!

128

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा 2 एप्रिल 2023 रोजी झाली असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी संघ आणि भाजपवर जो हल्ला चढवला आहे, त्यातून एक बाब स्पष्ट होते आहे, ती म्हणजे संजय राऊत असोत, शरद पवार असोत किंवा अगदी उद्धव ठाकरे असोत या तिन्ही नेत्यांना संघ आणि भाजपवर हल्लाबोल करायला सावरकरांच्या विचारांच्या भांडवलाचा आधार घ्यावा लागतो आहे. अर्थात ते सावरकरांच्या “निवडक” विचारांच्या भांडवलाचा मारा संघ, भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर करीत आहेत. सावरकर विचारांचे संपूर्ण भांडवल ठाकरे – पवार आणि राऊतांनाही पेलणे शक्य नाही!!

ठाकरे – पवार – राऊतांची मखलाशी

सावरकर आणि संघ यांचे हिंदुत्व वेगळे आहे. सावरकरांचे विचार सामाजिक, पुरोगामी आणि विज्ञाननिष्ठ होते, वगैरे मखलाशी शरद पवारांनी कालच नागपूरच्या पत्रकार परिषदेत केली, तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा शेंडी-जानव्याचे हिंदुत्व हा आवडता शब्द आहे आणि तोच आज त्यांनी दिल्लीच्या पत्रकार परिषदेत वापरला. सावरकर दाढीवाल्यांच्या विरोधात होते. ते चकचकीत राहायचे. त्यांना दाढी वाढवलेली आवडायची नाही, असे अजब तर्कट लावून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांना सावरकर साहित्याचे पारायण करण्याचा सल्ला दिला. सावरकरांनी शेंडी-जानव्याचे हिंदुत्व कधी मानले नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तेच हिंदुत्व अनुसरले याची आठवण राऊतांनी करून दिली आणि सावरकर दाढीवाल्यांच्या विरोधात होते, असे वक्तव्य करून त्यांनी एक प्रकारे नाव न घेता गोळवलकर गुरुजींकडे सूचन केले!!

पवार – बाळासाहेब विचारात भेद

पण सावरकरांचे हिंदुत्व असो, त्यांचे गाई संदर्भातले विचार असोत अथवा त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार असोत याच विचारांचे भांडवल ठाकरे, पवार आणि राऊतांना भाजप, संघ यांच्यावर हल्लाबोल करताना वापरावे लागत आहे. सावरकर विज्ञाननिष्ठ होते. सावरकर आधुनिक विचारांचे हिंदुत्व मानत होते. सावरकरांनी सामाजिक सुधारणा केल्या. जन्मजात जातीभेदांचा विरोध केला, ही ऐतिहासिक वस्तुस्थितीच आहे. पण हीच वस्तुस्थिती शरद पवार आणि काँग्रेस आत्तापर्यंत कधी मानत नव्हते!!

(हेही वाचा नेताजींच्या नातवाच्या डोक्यात केमिकल लोच्या! मुघल-नाझींबद्दल प्रेमाचा उमाळा, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राजपूतांचा द्वेष)

सावरकरांचे आणि बाळासाहेबांचे हिंदुत्व

बाळासाहेबांनी ही वस्तुस्थिती मान्य केली होती. किंबहुना बाळासाहेबांनी सावरकरांचेच हिंदुत्व अनुसरले होते आणि तेच संजय राऊत यांच्या तोंडून बाहेर आले. पण ज्या सावरकर विचारांच्या भांडवलाच्या आधारे ठाकरे, राऊत आणि पवार संघ आणि भाजपवर हल्लाबोल करत आहेत, ते विचार आणि संघ – भाजपाचे विचार हे एवढे भिन्न आहेत का?, हा खरा प्रश्न आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाची छटा आणि संघाच्या हिंदुत्वाची छटा यात काही विशिष्ट वैचारिक भेद आहेत हे खरे. पण म्हणून सावरकर शेंडी-जानव्याचे हिंदुत्व मानत नव्हते आणि संघ, भाजप शेंडी-जानव्याचे हिंदुत्व मानतात हा अजब शोध उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कुठून लावला की त्यांना फक्त शरद पवारांचा महाराष्ट्रातला नॅरेटिव्ह पुढे चालवायचा आहे?, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत.

नॅशनल सब्जेक्ट मॅटर

कारण शरद पवारांना सावरकरांचे गाई विषयीचे विचार त्यांची विज्ञाननिष्ठा त्यांचा पुरोगामी सामाजिक विचार हे मान्य आहेत. किंबहुना ते मान्य करावे लागले आहेत. कारण सावरकर आज महाराष्ट्राच्या तर सोडाच, पण राष्ट्रीय अजेंड्यावरचे सर्वात महत्त्वाचे “सब्जेक्ट मॅटर” ठरले आहेत. त्यामुळे सावरकर विचारांच्या भांडवलातला विशिष्ट भाग उचलून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत एका लाईनीत उभे राहून भाजप आणि संघावर हल्लाबोल करत आहेत.

काँग्रेसी परिघाबाहेर

मग प्रश्न हा पडतो की, राऊत आणि ठाकरेंचे ठीक आहे. कारण मूळातच ते काँग्रेसही विचारसरणीच्या परिघा बाहेरचेच नेते आहेत. भले आज त्यांचे भाजप – संघ आणि एकनाथ शिंदे यांच्याशी राजकीय वैर तीव्र झाले असेल, पण ठाकरे आणि राऊत हे हिंदुत्वाच्या परिघाबाहेर कधीच नव्हते. किंबहुना हिंदुत्वाच्या परिघाच्या आतले राजकारण करणे हे त्यांच्या दृष्टीने अपरिहार्य आहे.

पवारांची मजबुरी

पण शरद पवारांना काय झाले? पवार तर काँग्रेसी परिघातले राजकारण करणारे महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आहेत. सावरकर विचार तर काँग्रेसी परिघा बाहेरचा आहे. पण त्याचा वापर पवारांना करावा लागणे ही त्यांची आज राजकीय अपरिहार्यता बनली आहे. एरवी काँग्रेसची राजकीय संस्कृतीतील नेत्यांनी वाळीत टाकलेले सावरकर हे नाव पवारांना घ्यावे लागते आहे. ही त्यांची राजकीय मजबुरी आहे!!

(हेही वाचा इंग्रज म्हणायचे, ‘वीर सावरकर डेंजर…’ देवेंद्र फडणवीसांनी सांगितला किस्सा)

सावरकर भांडवलाचा उपयोग होईल?

याचा सरळ अर्थ असा आहे की, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून सावरकर देशपातळीवर “पॉलिटिकल सेंटर स्टेज”ला तर आणून ठेवलेच आहेत, पण त्यापलीकडे आता सावरकरांच्या विचारांचे “निवडक” भांडवल देखील उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांना संघ-भाजपला टार्गेट करताना वापरावे लागत आहे. अर्थात त्या भांडवलाचा या तिन्ही नेत्यांना उपयोग किती होईल?, हा प्रश्न बोचरा असला तरी त्याचे उत्तर मिळवणे त्यांना राजकीयदृष्ट्या अनिवार्य आहे!!

– विनायक ढेरे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.