अखेर आशिष देशमुखांचं काँग्रेसमधून निलंबन

102

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे माजी आमदार आशिष देशमुखांचं अखेर काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली असून आशिष देशमुखांना कारणे दाखवा ही नोटीस बजावण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी माध्यमांसोबत बोलताना आशिष देशमुख यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली होती. तेव्हापासून आशिष देशमुखांच्या निलंबनाची चर्चा सुरू होती, तसंच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचंही बोललं जात होत. यादरम्यानच काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आशिष देशमुखांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच कारणे दाखवा ही नोटीस बजावण्यात आली. माहितीनुसार, या नोटीशीला तीन दिवसात उत्तर द्यावं, असं शिस्तपालन समितीनं निर्देश दिले आहेत. या नोटीशीचं उत्तर येईपर्यंत आशिष देशमुखांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे.

राहुल गांधींबद्दल काय म्हणाले होते देशमुख?

ओबीसी समाजाबद्दल केलेल्या विधानबद्दल राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी. कारण ओबीसी समाज राहुल गांधीच्या वक्तव्यानं दुखावला आहे. त्यामुळे राहुल गांधीनी माफी मागण्यात काहीच गैर न मानता ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी, असं विधान काँगेस नेते अशिष देशमुख यांनी केलं होत.

नाना पटोलेंविषयी आशिष देशमुख म्हणाले…

नाना पटोले हे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल करण्यासाठी खोडा घालत आहेत. नागपूरमध्ये १६ एप्रिलला मविआची वज्रमूठ सभा होत असताना नाना पटोले सांगतात की, २१ ते २५ एप्रिलदरम्यान राहुल गांधींची नागपूरमध्ये सभा होणार आहे. राहुल गांधींची १६ एप्रिलऐवजी वेगळी वेळ मागणं हे नाना पटोलेंच्या वेगळी चूल मांडण्याचं संकेत असल्याचा दावा देशमुख यांनी केला होता. तसंच  नाना पटोलेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिन्याला एक खोका मिळत आहे. पटोले हे लवकरच गुवाहाटीला असतील, असाही दावा आशिष देशमुखांनी केला होता.

‘माफी मागायला मी राहुल गांधी नाही’

त्याचबरोबर माझी वक्तव्ये ही पक्षविरोधी नाहीत. तर मी पक्षाच्या हितासाठी वेळोवेळी भूमिका घेत असतो. तसंच मी केलेल्या कुठल्याच वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही. माफी मागायला मी राहुल गांधी नाही. म्हणून मी माफी मागणार नाही. ओबीसी समाजाकडून भरभरून मते मला मिळाली आहेत. त्यामुळे ओबीसी समाज दुखावला गेला असेल तर आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू, अशी भूमिका ही आशिष देशमुख यांनी मांडली होती.

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढावी, त्यांच्याविरोधात मी लढायला तयार; नवनीत राणांचे आव्हान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.