नायर रुग्णालयातील उपहारगृह (कॅन्टीन) तसेच खाणावळ (मेस) मागील काही महिन्यांपासून बंद असून यामुळे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे हाल होत आहे. निवासी डॉक्टरांसह नर्सेससाठी जेवण व नाश्ताची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना रुग्णालय तसेच वसाहतीच्या बाहेरील उपहारगृहांमध्ये जावून क्षुधाशांती करावी लागत आहे. परिणामी निवासी डॉक्टरांसह नर्सेसना अधिक पैसे मोजून जेवण, नाश्ता करावा लागत आहे. मात्र, महापालिकेच्या नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच रुग्णालयीन व्यवस्थापनासह प्रशासनातील अधिकाऱ्यांचे याकडे लक्षच नाही.
मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात एकूण ६ उपहारगृह (कॅन्टीन) तसेच खाणावळ (मेस) असून त्यातील चार ठिकाणी याबाबतची सेवा बंद असल्याची तक्रार निवासी डॉक्टरांकडून केली जाते. या रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या वसतीगृहातील ४०० डॉक्टरांना मागील दोन वर्षांपासून कॅन्टीन बंद असल्याने खाण्याचे पिण्याचे हाल होत असल्याची तक्रार शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी व माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत व युवा सेना कार्यकारी सदस्य सिध्देश धाऊसकर व राजन कोळंबेकर यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार यांची भेट घेऊन केली. कॅन्टीन व मेस बंद असल्याने पर्यायी व्यवस्था न दिल्याने निवासी डॉक्टरांना निकृष्ठ दर्जाचे जेवण व नाश्ता मिळत असून यासाठी जास्तीचे पैसेही मोजावे लागत आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीच्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच ३१ मार्च २०२३ रोजी मार्डच्या शिष्टमंडळाने नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र पाठवून जिमखाना कॅन्टीनमध्ये कर्मचारी ऑर्डर घेण्यासाठी येत नसल्याचे तसेच ऑर्डर देण्यापूर्वी अनेक वेळा कॉल करावा करावा लागतो. ऑर्डर दिल्यानंतर अन्न वितरीत करण्यासाठी ३० ते ४० मिनिटांपेक्षा वेळ लागतो. तसेच खूपच मर्यादीत अन्नपदार्थ उपलब्ध असतात. विशेषत: संध्याकाळच्या वेळी चपाती बहुतेक वेळा उपलब्ध नसते आणि जेव्हा उपलब्ध असते तेव्हा ती निकृष्ठ असते. तसेच जी ऑर्डर दिली असते त्याऐवजी दुसरी ऑर्डर पाठवली जाते अशाप्रकारची तक्रार त्या निवेदनात मार्डच्या डॉक्टरांनी केला होता.
नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रविण राठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चार कॅन्टीन व मेस बंद नसून एक कॅन्टीन ही चार वर्षांपासून बंद आहे. ती काही आता बंद नसून एकमेव कॅन्टीन बंद होती, त्याबद्दल आहार तज्ज्ञांच्या अहवालानुसार अटी व शर्ती निश्चित करून निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांमध्ये ही सुध्दा कॅन्टीन सुरु होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मार्डच्या डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधित कॅन्टीनमध्ये सुधारणा सुचवली असून त्यानुसार सुधारणा झाली आहे आणि डॉक्टरही समाधानी असल्याचे डॉ. राठी यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा – मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वोत्कृष्ट; जगातील १९ सर्वोत्तम शहरात समावेश)
Join Our WhatsApp Community