‘निर्वासित’, ‘माझा खेळ मांडू दे’, ‘आत्मकथा’, ‘घंटानाथ’ सह १० नाटकांना नामांकने

111

मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५१व्या आंतरविभागीय – खात्यांतर्गत नाट्य स्पर्धेची नामांकने नुकतीच जाहीर झाली आहेत. या स्पर्धेचे आयोजन विलेपार्ले परिसरातील महानगरपालिकेच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात २१ फेब्रुवारी ते २९ मार्च २०२३ या कालावधीत करण्यात आले होते. या स्पर्धेत महानगरपालिकेच्या विविध विभागांतील २१ खाते, विभागांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी १० खाते, विभागांच्या नाटकांना नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेचा अंतिम निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या १३ एप्रिल २०२३ रोजी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख कामगार अधिकारी (प्रभारी) सुनील जांगळे यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाच्या वतीने गेली तब्बल ५० वर्षे कामगार-कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन नियमितपणे केले जात आहे. यामध्ये आंतरविभागीय नाट्य स्पर्धांचेही आयोजन करण्यात येते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार आणि महानगरपालिकेचे सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांच्या अधिपत्याखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

(हेही वाचा मढ, एरंगल, भाटीमधील ५ अनधिकृत फिल्म स्टुडिओवर बुलडोझर)

यंदाच्या ५१ व्या आंतरविभागीय-खात्यांतर्गत नाट्य स्पर्धेत अतिशय आशयपूर्ण नाटकांचे कलात्मक अविष्कार सादर करण्यात आले. यामुळे यंदाची स्पर्धा ही अत्यंत चुरशीची आणि उत्सुकता व उत्साह वाढविणारी ठरली आहे. या स्पर्धेचे अंतिम निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या स्पर्धेच्या परीक्षणची जबाबदारी दीपश्री चाफेकर, अनंत सुतार व मंगेश नेहरे यांनी पार पाडली. या स्पर्धेतील विजेत्यांना ज्येष्ठ नाट्य-सिने कलावंतांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या नाट्य स्पर्धेचे सुव्यवस्थित नियोजन हे प्रमुख कामगार अधिकारी सुनील जांगळे यांनी केले; तर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागीय कामगार कल्याण अधिकारी प्रवीण नगराळे आणि त्यांच्या चमुने विशेष परिश्रम घेतले.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या २१ नाटकांपैकी १० नाटकांना नामांकने जाहीर

  • नाटक ‘निर्वासित’; सादरकर्ते ‘आर मध्य’ विभाग, बोरिवली
  • नाटक ‘माझा खेळ मांडू दे’; करनिर्धारण व संकलन (मुख्यालय) विभाग
  • नाटक ‘जेंडर अॅन आयडेंटिटी’; केईएम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय
  • नाटक ‘लोकोमोशन’; सहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग
  • नाटक ‘आत्मकथा’; जल अभियंता विभाग
  • नाटक ‘घंटानाद’; सहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग
  • नाटक ‘ती रात्र’; सहाय्यक आयुक्त ‘एच पूर्व’ विभाग
  • नाटक ‘निर्वासित’ ; घनकचरा व्यवस्थापन विभाग
  • नाटक ‘सुरू’; प्रमुख कर्मचारी अधिकारी
  • नाटक ‘क्षुधाग्नि’; बा. य. ल. नायर रुग्णालय
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.