मरिन ड्राईव्हच्या ‘त्या’ जुन्या जेटीच्या जागेवर उभारणार ‘सी -साईड प्लाझा’

118

मुंबईतील चर्चगेट, नरिमन पॉईंट येथील मरिन ड्राईव्ह पाण्यालगत असलेल्या जुन्या जेटीच्या जागेवर आता सी साईड प्लाझा उभारण्यात येणार आहे. याठिकाणी असलेल्या जुन्या जेटीच्या जागेवर सुरक्षात्मक कठडे उभारुन आणि विद्युत रोषणाई करून गिरगाव आणि दादर चौपाटीवरील व्ह्यूविंग डेकप्रमाणे याला स्वरुप देता येईल. ज्या मुंबईकरांसह पर्यटकांना समुद्राच्या ६० मीटर आतमध्ये जाऊन समुद्राच्या चित्र न्याहाळता येणार आहे.

मुंबई शहरातील नरीमन पॉईट येथील मरिन ड्राईव्ह नजीक पाण्यालगतच्या क्षेत्रावर सी साईड प्लाझा बनवून सौंदर्यीकरण व रोषणाई करण्याबाबत कुलाबा विधानसभेचे भाजप आमदार आणि विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी मांडून नियोजन विभागाला निर्देश दिले होते. त्यानुसार नियोजन विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सूचना करून करत याचे संकल्पचित्र बनवून त्यांची निविदा मागवली.

नरीमन पॉईंट येथील समुद्रात जुनी जेटी असून या जेटीचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात नाही. त्यातच दहशतवादी हल्ल्यातील कसाब व त्याचे साथीदार हे बुधवार पार्कमधून समुद्र मार्गे आल्यानंतर ही जेटी पूर्णपणेच बंद होती. या जेटीच्या दोन्ही बाजुंनी समुद्राच्या लाटांची तीव्रता कमी करण्यासाठी ट्रेटा पॉड टाकण्यात आले आहेत. त्यामुळे जेटीच्या जागेवरच सुरक्षा कठडे अर्थात रेलिंग लावून विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मागवलेल्या निविदेत वित्राग इंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली असून याकरता ९५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. ही जेटी सागरी किनाऱ्यापासून ६० ते ७० मीटर आत आहेत. त्यामुळे या जेटीच्या जागेवर सुरक्षा कठडे बसवून या जागेचे सौंदर्यीकरण करत मुंबईकरांना समुद्र परिसर अगदी चांगल्या प्रकारे न्याहाळता येईल असे याचे सुशोभिकरण करण्यात येईल. एकप्रकारे हे ठिकाण सेल्फी पॉईंट प्रमाणेच असेल.

मुंबईत कोस्टल रोड वरळी सी फेसआणि समुद्र किनाऱ्याचा परिसर न्याहाळता येत नाही. त्यामुळे मरिन ड्राईव्ह येथील सी साईड प्लाझा मुळे मुंबईकरांना तसेच पर्यटकांना खूप जवळून दूरचा समुद्र न्याहाळण्याचे ठिकण उपलब्ध होईल. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सर्व प्रकारची मान्यता प्राप्त झाल्यानंतर या कामाला सुरुवात होईल असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.