मुंबई महानगरपालिकेच्या तानसा जलवाहिनीवर शनिवारी ०८ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३.३०च्या सुमारास पवई येथे अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली आहे. त्यामुळे या गळती दुरुस्तीच्या कामासाठी तानसा जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. म्हणून विलेपार्ले पूर्व ते जोगेश्वरी पूर्व तसेच धारावी भागात पाणी पुरवठा होणार नाही.
या गळतीमुळे या जलवाहिनीतील हा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात बंद करून या दुरुस्तीचे काम तात्काळ युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा जल अभियंता खात्याने व्यक्त केली आहे.
आकस्मिकरित्या उद्भवलेल्या या गळतीमुळे सध्या सुरू असलेला विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व (‘के पूर्व’) या विभागाचा पाणीपुरवठा आणि संध्याकाळी होणारा धारावी (‘जी उत्तर’) विभागाचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
संबंधित विभागातील जनतेने पाणी जपून व काटकसरीने वापरावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.